मुरबाड शहर : किशोर गायकवाड
जगप्रसिद्ध लिम्का बुक रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलेल्या मुरबाडच्या आजीबाई शाळेतील जेष्ठ विद्यार्थिनींनी अलीकडेच विमान प्रवासातून अयोध्यावारी साध्य करत शाळेच्या इतिहासात नवा अध्याय जोडला आहे. मराठी शाळांचा कायापालट घडवणारे, देशभर चर्चेत असलेले सोशल मीडिया स्टार सिद्धेश लोकरे यांनी हा उपक्रम राबवून समाजात अभिनव आदर्श ठेवला आहे. या अविस्मरणीय यात्रेमुळे आजीबाईंमध्ये प्रचंड समाधान व आनंद व्यक्त होत आहे.
दरम्यान, सहलीसाठी निघाल्यानंतर इंडिगो कंपनीचे नियोजित विमान अचानक रद्द झाल्याने मुंबईसारख्या महानगरात आजीबाईंची अडचण निर्माण झाली. मात्र या वेळी संध्यापर्व सेंटरच्या प्रमुख व समाजसेविका प्रियाताई जाधव यांनी पुढाकार घेत अल्पोहार, भोजन, निवास व सर्व सोयी उपलब्ध करून देत मुंबईत अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा सुंदर प्रत्यय घडवला.
तत्पूर्वी आजीबाईंचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. भाव-भक्तीगीतांच्या सुंदर गायन कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेलकर उद्योग समूहाचे दानशूर उद्योगपती विजयशेठ पनवेलकर, उद्योजक विलास डोंगरे, गणेश देशमुख, राजन नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आजीबाई शाळा चालवणाऱ्या कै. मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य दिलीप दलाल यांनी शाळेच्या प्रवासाचा भावपूर्ण आढावा मांडला. तसेच आजीबाईंना आवश्यक सहकार्य करण्यासाठी शिक्षिका शीतल मोरे, समाजसेवक प्रकाश मोरे, योगेश तेलवणे व निखिल देशमुख उपस्थित होते. या संपूर्ण अनुभवामुळे सर्व आजीबाईंच्या मनात नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.