

वाडा : वाडा तालुक्यात तब्बल चार नद्यांचे जाळे असूनही जानेवारीपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य लोकांना जाणवायला लागते. पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे डिसेंबर उजाडूनही बंधारे सताड उघडे असून नदीपात्रात मात्र खडखडाट पाहायला मिळत आहे. मलवाडा गावाजवळ पिंजाळ नदीवर दोन वर्षांपासून बंधारा बंद करण्यात प्रशासनाला यश आले नसून यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. दुरुस्ती व नको तिथे बंधारे उभारून निधीची लयलूट प्रशासनाकडून केली जात असून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
वाडा तालुक्याला पिंजाळ, तानसा, वैतरणा, देहर्जे व गारगाई या बारमाही वाहणाऱ्या नद्यांची देणगी लाभलेली आहे. नियोजनाचा मात्र अभाव असल्याने जानेवारी महिन्यापासून अनेक भागात जनतेला टंचाईचा सामना करावा लागत असून मे अखेरीस समस्या अधिक भीषण रूप धारण करते. पाली, पीक, मेट, सापने, पिंगेमान, करांजे अशा अनेक ठिकाणी जागोजागी लहानमोठे बंधारे बांधण्यात आले आहेत. डिसेंबर उजाडूनही बंधारे मात्र वाहत असून नद्यांची पात्र झपाट्याने कोरडी पडत आहेत.
राज्य शासनासह जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग पाण्याचे नियोजन करण्यासाठी अस्तित्वात आहे मात्र त्यांच्याकडून कोणतेही ठोस कामे होताना लोकांना पाहायला मिळत नाही. या प्रश्नाची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. स्थानिक तक्रारी करायच्या कुणाकडे असा लोकांचा प्रश्न उपस्थित होत आहे.
कंपनीसाठी कडेकोट व्यवस्था
वैतरणा नदीवर गांधरे गावाजवळ उभारण्यात आलेला बंधारा एका धनाढ्य कंपनीला कवडीमोल भावात पाणी विकते. हा बंधारा देखील जुना व दगडी आहे मात्र त्याची काळजी पाटबंधारे विभाग काटेकोर घेते उलट अन्य नद्यांवरील बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष करते असा लोकांचा आरोप आहे.
बंधारा बंद करावा...
20 लाख खर्चून उभारण्यात आलेला मलवाडा गावाजवळील बंधारा गेट दोन वर्षांपासून बंद करण्यात पाटबंधारे विभागाला यश आले नसून अधिकारी अजित जाधव स्थानिक ग्रामपंचायतीकडे बोट दाखवून आपले हात वर करीत आहेत. बंधारा बंद करायचा नाही, तर तो उभारण्याचा घाट घातला कशासाठी असा सवाल स्थानिक शेतकरी विक्रांत पाटील यांनी विचारला असून तत्काळ हा बंधारा बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.