

ठाणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असला तरी, मराठी शाळांवर इंग्रजी शाळांचे अतिक्रमण सुरूच असून गेल्या सात वर्षात ठाणे महापालिकेच्या १७शाळा बंद पडल्या असल्याची कबुली राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. इंग्रजी शाळांमध्ये आपल्या मुलांना घालण्याचा पालकांचा वाढता कल यामुळे गेल्या सात वर्षात मराठी शाळांच्या पटसंख्येत घाट होत असून परिणामी पालिकेच्या मराठी शाळांवर कुलूप लावण्याची वेळ येत असल्याचे गेल्या काही वर्षातील हे भयानक वास्तव आहे.
ठाणे महापालिकेच्या मराठी शाळांच्या संदर्भात आमदार अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला असला तरी, मराठी शाळांचा प्रश्न हा आताच नसून यापूर्वी देखील पालिकेच्या मराठी शाळा बंद का पडतात यावरून अनेकवेळा राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांनी आंदोलने केली आहेत. ठाणे मनपा क्षेत्रामध्ये एकूण ७६९ खाजगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच ठाणे महापालिएकेच्या शाळांचा समावेश आहे. यामध्ये १०३ प्राथमिक तर २२ माध्यमिक अशा एकुण १२५ शाळा ठाणे महापालिकेच्या आहेत. तर २०९ खाजगी अनुदानित आणि ५६० विनाअनुदानित शाळा आहेत.
गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात इंग्रजी शाळांची संख्या देखील वाढली आहे. तर इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा पालकांचा कल देखील वाढला आहे. इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिक्षण देणे हे आता प्रतिष्ठेचे समजले जात असून त्यामुळे बहुतांश पालक आता त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळांमधून शिक्षण देण्याचा निर्णय घेत आहेत.
आमदार अबू आझमी यांनी देखील ठाणे महापालिकेच्या मराठी शांळांच्या संदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असला तरी मराठी शाळांना कुलूप लागण्याचे प्रमाण हे गेल्या काही वर्षांपासून सुरु झाले आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी १७ शाळा बंद पडल्याची कबुली दिली असली तरी, अवैध शाळांवर शिक्षण विभागाने केलेल्या कारवाईमुळे शाळांची संख्या कमी झाली असेल असा दावा त्यांनी केला आहे.
दादा भुसे यांनी आझमी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईतील ४२० बेकायदेशीर शाळांवर कारवाई झाल्याचे सांगितले होते (ज्यात ४७ बंद), आणि मराठी शाळा बंद होणार नाहीत असे आश्वासन देखील दिले आहे.