Mumbra Police Infant Kidnapping Rescued
ठाणे : मुंब्रा येथून अपहरण झालेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी सलग सहा दिवस आणि रात्र अथक तपास करत तब्बल १६०० सीसीटीव्ही फुटेज पडताळली. मुंब्रा ते टिटवाळा, मुंब्रा ते वांगणी, तसेच मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासून अखेर अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
तिच्या चौकशीत अपहृत चिमुकली अकोला जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अकोला जिल्ह्यात धाव घेऊन तीन महिन्यांच्या आफिया हिला सुखरूप ताब्यात घेऊन मुंब्रात आणले आणि तिच्या आईकडे सुपूर्द केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंब्रा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मुंब्रातील डीसीबी बँकेसमोर फरजाना मोहम्मद फिरोज मन्सूरी (२३) या महिला आपल्या दोन मुलींना घेऊन रस्ता ओलांडत होत्या. यावेळी मोठी मुलगी रडू लागल्याने त्या गोंधळल्या. त्याच क्षणी एका अनोळखी महिलेने “छोटी बच्ची को मेरे गोद में दे दो, मैं भी सामने ही जा रही हूँ,” असे सांगत तीन महिन्यांच्या आफिया हिला आपल्या कुशीत घेतले. मात्र रस्ता ओलांडतानाच ही महिला चिमुकलीसह पळून गेली.
बराच शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने फरजाना यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून चार तपास पथके तयार केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासणीमध्ये बुरखा परिधान केलेल्या महिलेने अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. ही महिला रिक्षातून मुंब्रा स्थानकापर्यंत गेल्याचेही फुटेजमध्ये आढळून आले. मात्र स्थानक परिसरात बुरखाधारी महिलांची मोठी वर्दळ असल्याने संशयितेची ओळख पटवणे कठीण ठरले.
त्यानंतर पोलिसांनी मुंब्रा ते वांगणीदरम्यानच्या सर्व स्थानकांचे सीसीटीव्ही तपासले; मात्र संशयित कुठेही उतरल्याचे दिसले नाही. पुन्हा मुंब्रा स्थानकावरील फुटेज बारकाईने पाहिले असता, एक संशयित महिला प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एका पुरुषासह आणि दुसऱ्या बुरखाधारी महिलेशी संवाद साधताना दिसून आली. त्यानंतर तो पुरुष व महिला चिमुकलीसह सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले.
या दोघांनी कुठल्या स्थानकावर उतरलो याचा शोध घेण्यासाठी ठाणे, नाहूर, भांडुप, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला आदी स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यामध्ये ते ठाणे स्थानकावर उतरल्याचे आढळून आले. मात्र गर्दीचा फायदा घेत महिलेने बाळाचे कपडे व स्वतःचा नकाब बदलल्याने पोलिसांची दिशाभूल झाली.
यानंतर तपास पुन्हा नव्याने सुरू करण्यात आला. मुंब्रा स्थानकावरील सीसीटीव्हीच्या सखोल तपासणीत दोन बुरखाधारी महिलांपैकी एक सीएसएमटीकडे गेली, तर दुसरी महिला रिक्षातून मुंब्रा स्थानकाबाहेर गेल्याचे आढळले. अखेर रिक्षातून गेलेल्या महिलेचा कसून शोध घेत इंशानगर, मुंब्रा येथून नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिनेच अपहरण केल्याची कबुली देत बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी गावात असल्याची माहिती दिली.
त्यानुसार मुंब्रा पोलिसांचे पथक खेटरी गावात पोहोचले आणि आफिया हिला मोहम्मद मुजीब गुलाब (३१) व त्याची पत्नी खैरूनिसा मुजीब मोहम्मद (३०) यांच्या तावडीतून सुखरूप मुक्त केले. या प्रकरणात दोन महिला व एका पुरुषास अटक करण्यात आली आहे.
अपहरण झालेली चिमुकली आफिया हिला सुखरूप मुंब्रात आणून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. मुलगी परत मिळताच आईने तिला हृदयाशी घट्ट कवटाळले, तर चिमुकलीही मायेच्या कुशीत निवांत विसावली.
या गुन्ह्याच्या तपासात मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, शरद कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत व त्यांच्या पथकाने सहा दिवस अहोरात्र परिश्रम घेतले.