ठाणे प्रतिनिधी
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिल मोरे यांचे उपचारादरम्यान ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. त्यांना डोक्याला गंभीर मार लागला होता आणि ते आयसीयूमध्ये दाखल होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत.
या अपघातात एकूण १४ जण जखमी झाले होते. आतापर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कळवा रुग्णालयात एका जखमीवर उपचार सुरू असून जे.जे. रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित जखमींना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघाताची चौकशी सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांची कार्यक्षमता तपासली जात आहे. जखमींच्या प्रकृतीवर प्रशासनाचे लक्ष असून, त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत दिली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा स्थानकावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. धावत्या लोकल ट्रेनमध्ये अत्यंत गर्दी असताना, धक्काबुक्कीमुळे एकूण ११ प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. कल्याणकडून मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये घडली. या अपघातात पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य काही जण गंभीर जखमी आहेत.
गंभीर जखमींना कळवा, जे.जे. आणि ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल मोरे या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. त्यांना डोक्याला गंभीर मार लागला होता. अपघाताची प्राथमिक माहिती समोर आली असून प्रवासी अत्यंत भरलेल्या लोकलमध्ये दरवाजाजवळ उभे होते, तेव्हाच ही दुर्घटना घडली. अपघातामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, लोकलमधील वाढती गर्दी व व्यवस्थेचा अभाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतो आहे. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.