ठाणे: ठाणे शहरापासून अवघ्या 9.2 किलोमीटर अंतरावर वसलेले मुंब्रा शहर आणि शहरापासून तसेच समुद्र सपाटीपासून 1500 फूट उंच पर्वतावर वसलेली स्वयंभू मुंब्रा नवदुर्गा देवी. हे निसर्ग आणि भक्तीचा आगळावेगळा अनुभव देणारे देवीचे तीर्थक्षेत्र आहे.
मुंब्रा पारसिक पर्वतामध्ये अतिशय सुंदर देखावे आणि गर्द झाडीत वसलेली ही स्वयंभू श्री. नवदुर्गा मुंब्रा देवी आहे. मुंब्रा येथील देवीच्या तीर्थ क्षेत्रात नवरात्रोत्सव व इतर दिवसात भरपूर भाविक देवीच्या दर्शनाला येतात. मुंब्रा शहराजवळच पारसिक पर्वताचा पायथा आहे. या पायथ्यापासूनच देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी कमानी उभारलेल्या आहेत. ज्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाणारा मार्ग दर्शित होतो. त्या कमानीपासून मंदिरात पोहोचण्यासाठी तब्ब्ल 758 पायर्या आहेत. देवीची प्राणप्रतिष्ठापना व देवीचे मंदिर नाना भगत यांच्याद्वारे उभारण्यात आले होते. नाना भगतांनाच देवीने साक्षात्कार दिल्याचे सांगण्यात येते.
नाना भगत यांचे कुटुंब गेल्या 100 वर्षापासून देवीची सेवा करत आहेत. दरवर्षी नवरात्र उत्सवादरम्यान हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येतात व नवरात्रीच्या नऊ दिवसांत पुजार्यांकडून देवीचे निरनिराळे सोहळे पार पाडले जातात. मुंब्रा ग्रामस्थांच्या मते मुंब्रा नवदुर्गा देवी स्वयंभू व जागृत असून देवीच्या उगमाची जुनी आख्यायिका स्पष्ट करण्यात येते.
या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांचे आणि मुंब्रा देवीच्या प्रति भक्तीचे काहीसे संदर्भ छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या पुस्तकात भेटतात. कल्याण शहराची निगा राखण्यासाठी मुंब्रा देवी देवस्थान, खाडी, उल्हास नदीद्वारे महाराजांचे मावळे शत्रूवर हल्ला करायचे असे पुरावे पुस्तकांत दिले आहेत. त्याचबरोबर मुंब्रा नवदुर्गा देवी ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील एका कुटुंबाची कुलस्वामिनी आहे.
देवीच्या जागरूकतेची जाणीव
पूर्वीच्या काळात पर्वतावर रात्रीच्या समयी अचानक दिव्य ज्योत पेटायची व अवघ्या पंधरा पाऊले पुढे देवीच्या स्थानी येऊन थांबायची. दररोज असे घडू लागल्यामुळे मुंब्रा येथील ग्रामस्थ या प्रकरणाला घाबरून निरनिराळे तर्क लावू लागले. त्या दरम्यान एका दिवशी नाना भगत यांना देवीने स्वप्नात साक्षात्कार दिला आणि देवीच्या जागरूकतेची जाणीव करून दिली. तेव्हापासून नाना भगत त्यांचे कुटुंब आणि मुंब्रा येथील ग्रामस्थ देवीची मनोभावे सेवा करत आहेत.