Mumbai Underwater Glass Tunnel Pudhari
ठाणे

Mumbai Underwater Glass Tunnel: काचेच्या बोगद्यातून पर्यटकांना बघता येणार समुद्राखालचे रंगीत विश्‍व

मुंबईतील राणीच्या बागेत साकारणार अत्याधुनिक मत्स्यालय; मलेशिया, स्वित्झर्लंड, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणी

पुढारी वृत्तसेवा

प्रियानी पाटील

ठाणे: कोकणातील समुद्राखालचे विश्‍व न्याहाळता यावे आणि पर्यटनाला नवा आयाम मिळावा म्हणून काही नवे प्रकल्प सुरू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. यामध्‍ये जलपरीपासून सिंधुदुर्गात वायंगणी येथे होणाऱ्या सी- वर्ल्ड प्रकल्पापर्यंतच्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

त्यातीलच एक प्रकल्प जो मुंबईतील राणीच्या बागेमध्‍ये मत्स्यालय प्रकल्प म्हणून साकारणार आहे. मलेशिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर या देशांमध्‍ये पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी असे प्रकल्प उभारलेले आहेत.

त्याच धर्तीवर हे प्रकल्प असतील. मुंबई आणि सिंधुदुर्ग या दोन्ही पर्यटन क्षेत्रांमध्ये काचेच्या बोगद्यातून पाण्याखालचे विश्व अनुभवण्याची अत्यंत आधुनिक आणि नवीन दालने पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचा काचेचा बोगदा मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, प्राणिसंग्रहालयात होणार आहे. दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर हा ३६ मीटर लांबीचा अत्याधुनिक काचेचा बोगदा उभारला जाईल.

यामध्‍ये १८० अंश काचेच्या बोगद्यातून फिरताना पर्यटकांना आपल्या डोक्यावर आणि अवतीभवती पोहणारे रंगीबेरंगी आणि दुर्मीळ जलचर अतिशय जवळून पाहता येतील. याशिवाय, मुंबईत बोरिवलीसारख्या विविध भागांतही ‘अंडरवॉटर फिश टनेल एक्स्पो’ आयोजित केले जातात.

ज्याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. सिंधुदुर्गातील पाण्याखालील जगसिंधुदुर्ग जिल्हा हा आधीच स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता तिथे अधिकृत ग्लास टनेल ॲक्वेरियमची सोय केली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्प रखडला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी आणि तोंडवली किनारपट्टीवर देशातील पहिला ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प कोकणातील पर्यटन वाढवण्यासाठी १० वर्षांपूर्वी घोषित करण्यात आला होता.

अमेरिकेच्या धर्तीवर एक मोठे कोस्टल ॲम्युझमेंट पार्क आणि सागरी जीवसृष्टीचे दर्शन घडवणारे केंद्र येथे उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थांचा जमीन संपादनाला विरोध आणि विविध प्रशासनिक कारणांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बऱ्याच काळापासून रखडला आहे.

काय आहे सिंगापूर-मलेशियात?

सिंगापूरमध्ये रिसॉर्ट्‌स वर्ल्ड सेंटोसा अंतर्गत चालवले जाणारे सागरी प्रकल्प सेंटोसा ओशनेरियम आशियातील प्रसिद्ध सागरी केंद्र आहे. येथे हजारो प्रजातींचे जलचर आणि विस्तीर्ण असा अंडरवॉटर ग्लास टनेल पाहायला मिळतो. मलेशियातील ॲक्वेरियममध्ये ११ वेगवेगळ्या थीमॅटिक झोनमध्ये १३,००० पेक्षा जास्त समुद्री जीव ठेवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT