

पवन होन्याळकर
मुंबई: अकरावीचे वर्ग सुरू झाले, शैक्षणिक वर्षाचा पहिला टप्पाही संपत आला; मात्र अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी विशेष फेऱ्यांचा सिलसिला सुरूच आहे. आता १२ वी विशेष फेरी जाहीर करण्यात आली असून, सप्टेंबरअखेरपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
सध्या राज्यातील ९ हजार ७१८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २२ लाख ४९ हजार ७९ जागा आहेत. यापैकी १३ लाख ६३ हजार १३९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तब्बल ८ लाख ८५ हजार ९४० जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया नेमकी कधी थांबणार, असा प्रश्न महाविद्यालयांकडून उपस्थित होत आहे.
बाराव्या विशेष फेरीचे २८ सप्टेंबर रोजी प्रवेशाचे वाटप होणार असून, त्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे. १ ऑक्टोबरला रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत.
दहावी उतीर्ण १५ लाख ६२ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत ११ लाख ९५ हजार १४० विद्यार्थ्यांचे तर कोट्यांतर्गत १ लाख ६७ हजार ९९९ प्रवेश झाले आहेत. सर्व मिळून १३ लाख ६३ हजार १३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
अकरावीच्या शैक्षणिक वर्षासाठी स्वयंअर्थसहाय्याच्या नावाने विनाअनुदानित महाविद्यालयांना दरवर्षी नव्याने मान्यता दिल्या जातात. तसेच अनेक महाविद्यालये तुकड्या वाढवून घेतात. यामुळे राज्यात अजूनही ८ लाख ८५ हजार जागा रिकाम्या आहेत.
विशेष म्हणजे, प्रवेश प्रक्रिया संपत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयांनाही शैक्षणिक नियोजन करताना अडचणी येत आहेत. वाढत जाणाऱ्या प्रवेश फेऱ्या, सतत बदलणारे नियम आणि स्पष्ट वेळापत्रकाचा अभाव याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, महाविद्यालयांच्या अध्यापन वेळापत्रकावर आणि प्रशासकीय कामकाजावर होत आहे.
गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना यू-डायस प्रणालीत समाविष्ट करताना अडचणी आल्या, तर काही ठिकाणी संचमान्यतेत हे प्रवेश ग्राह्य धरले गेले नव्हते. यंदा राज्य मंडळाचा दहावीचा निकाल लवकर लागला. मात्र तरीही अद्याप प्रवेशाच्या विशेष फेऱ्या सुरूच आहेत. त्यामुळे उशिरा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम भरून काढण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे, असे प्राचार्य सांगत आहेत.
राज्यातील प्रवेशाचे चित्र
कनिष्ठ महाविद्यालये - ९,७१८
विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी - १५,६२,७४४
केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या जागा - १९,२२,८२९
केंद्रीय ऑनलाइन झालेले प्रवेश - ११,९५,१४०
रिक्त जागा - ७,२७,६८९
कोटा अंतर्गत असलेल्या जागा - ३,२६,२५०
कोट्यातील झालेले प्रवेश - १,६७,९९९
कोट्यातील रिक्त जागा - १,५८,२५१
एकूण जागा - २२,४९,०७९
एकूण आतापर्यंतचे प्रवेश - १३,६३,१३९
एकूण रिक्त जागा - ८,८५,९४०
विद्यार्थ्यांनी कुठे प्रवेश घेतले शोधणार
अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या मात्र अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती, तसेच त्यांनी अकरावीऐवजी अन्य कोणत्या अभ्यासक्रमाला किंवा संस्थेत प्रवेश घेतला आहे, याची माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे.
यासाठी विशेष व्यवस्था उभारण्याचे काम शिक्षण विभाग करणार आहे. तसेच पुढील वर्षापासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.