ठाणे: मुंबई-नाशिक मार्गावरील खारीगाव येथे पुन्हा टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या टोलनाक्यास आमचा विरोध आहे. या टोलनाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खारीगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्याने टोलनाका उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने विरोध केला आहे.
याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की, 1998 या वर्षी खारीगाव टोलनाका सुरू झाला होता. टोलवसुली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झाले होते. 2017 मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण, भिवंडी, नाशिक, उरण जेएनपीए येथील हजारो हलकी, जड-अवजड वाहन चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती.
टोल वसुली बंद होऊन अवघी 9 वर्ष पूर्ण होत असतानाच, माजिवडा-वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे. या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा प्रखर विरोध असणार आहे. वाहन खरेदी करतानाच रोडटॅक्स घेतला जात असतानाच पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईने पिचलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे.
या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, तर प्रवास खर्च वाढल्याने व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढविले जाणार आहेत. त्यामुळेच आमचा या टोलनाक्याला विरोध आहे. मात्र, हे सरकार पाशवी बहुमताचा आधार घेऊन टोलनाक्याचा विरोध चिरडून टाकणार आहेत, यात शंका नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024 रोजी ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर हा टोल नाक्यावर ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्यावी.
दोन वेळा भरावा लागणार टोल
दरम्यान, खारीगाव किंवा मुंब्रा येथील नागरिकांना घोडबंदर गाठायचे असेल, तर हाय-वे हा उत्तम पर्याय आहे. मात्र, ठाणे शहरातच यायचे असताना किंवा पुन्हा परतीचा प्रवास करताना दोन वेळा टोल भरावा लागणार आहे किंवा टोल टाळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करत कळवा, कोर्टनाका, जांभळी नाका, खोपट जंक्शन, माजीवडा येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करून द्यावा म्हणूनच ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी; खारीगाव टोल नाक्यावर जर ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात आली नाही; तर आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे.