डोंबिवली शहर : संस्कृती शेलार
मध्य रेल्वेच्या मार्गावर गर्दीने आता अक्षरशः उंबरठा ओलांडला आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळेत तर प्लॅटफॉर्मवर उभं राहणंसुद्धा कठीण होतं. ढकलाढकली, गोंधळ, फूटबोर्डवर लटकणारे प्रवासी, दरवाज्याशी तुडुंब झालेली चेंगराचेंगरी ही आता दररोजची कसरत झाली आहे.
मध्य रेल्वेवर दररोज पासधारक 2 ते 3 लाख प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर 835 लोकल, त्यापैकी डोंबिवलीपरेलदरम्यान 65 लोकल नियमित धावत असल्या तरी गर्दी थांबण्याचं नाव घेत नाही. कल्याण डोंबिवली रस्त्यावरील कोंडीचं चित्रही तितकंच भीषण. डोंबिवलीहून मुंबईला जाण्यासाठी जिथे पूर्वी एक तास लागायचा, तिथे आज दोन ते तीन तास खर्ची पडतात. मानकोली, कल्याण-शिऴफाटा या भागातील ट्रॅफिकमुळे लोक रेल्वेकडे धाव घेतात आणि ज्याचा थेट परिणाम रेल्वेवरील गर्दीवर होतो.
प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासासाठी मोठी आव्हाने भेडसावत आहेत. गर्दीमुळे लोकांना रेल्वेच्या फूटबोर्डवर उभं राहावं लागत असून, त्यामुळे अपघात होण्याची भीती नेहमीच वर्तवली जाते. कल्याण आणि डोंबिवलीच्या लोकल मार्गावर रोज लाखो प्रवासी गर्दीत प्रवास करत आहेत. गर्दी इतकी वाढली आहे की, अनेकदा प्रवाशांना जीवाचा धोका पत्करावा लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी या वेळेत फलाटावर जणू ‘मानवकुंभ’ तयार होतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्ववर 15 डब्बे लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत.
डोंबिवलीची लोकसंख्या वाढतेय पण रेल्वेचा भार घेताना मात्र व्यवस्था कमकुवत पडतेय. रोडवरून मुंबईला जायचं म्हटलं की जिथे आधी एक तास लागत होता, तिथे आता दोन-तीन तास जातात. त्यामुळे लोक ट्रेनकडे धावतात आणि गर्दी अनियंत्रित होते. आता 15 डबे केले किंवा 3 डबे वाढवले म्हणून काही फरक पडणार नाही; कारण प्रवासी वाढतायत, पण मार्ग वाढत नाहीत. मेट्रो सारखे पर्याय पाचदहा वर्षांपूर्वीच सुरू झाले असते तर आज हे अपघात, ही ढकलाढकली, ही जीवघेणी परिस्थिती आपण टाळू शकलो असतो.लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या
गाडी येते तेव्हा सर्व प्रवासी एवढ्या वेगाने धावतात की ढकलाढकलीत श्वास घ्यायलाही वेळ राहत नाही. सीट तर दूरची गोष्ट फुटबोर्डवर जागा मिळणंही नशिबावर अवलंबून आहे. रोजचा प्रवास जीव देऊन करावा लागतो, पण पर्यायच नाही. रस्त्यावरचा ट्रॅफिक आणि ट्रेनची मर्यादित संख्या, दोन्हीकडे अडकलो आहोत.सुहास कुलकर्णी, प्रवासी