Swara swimming record Arabian sea Pudhari
ठाणे

Mumbai Swimming Record | मुंबईच्या स्वराने रचला इतिहास: अरबी समुद्रात ४० किमी एकल पोहण्याचा विक्रम ९.३९ तासांत पूर्ण

गेटवे ऑफ इंडिया ते ट्रॉम्बे जेट्टी आणि परत गेटवे ऑफ इंडिया असा ४० किमीचा अखंड एकल समुद्र पोहण्याचा पराक्रम

पुढारी वृत्तसेवा

Arabian Sea 40km solo swim

डोंबिवली : मुंबईच्या स्वरा संदेश सावंत या १९ वर्षीय जलतरणपटूने अरबी समुद्रात नवा इतिहास रचला आहे. गेटवे ऑफ इंडिया ते ट्रॉम्बे जेट्टी आणि परत गेटवे ऑफ इंडिया असा ४० किमीचा अखंड एकल समुद्र पोहण्याचा पराक्रम तिने अवघ्या ९ तास ३९ मिनिटांत पूर्ण करून भारतीय खुल्या समुद्र पोहण्यात मानाचा तुरा रोवला आहे.

रामनारायण रूईया स्वायत्त महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या स्वराचा हा पहिलाच अल्ट्रा-डिस्टन्स एकल समुद्र पोहण्याचा प्रयत्न होता. रूपाली रेपाळे स्विमिंग अकादमीची विद्यार्थीनी असलेली स्वरा रामचंद्र ठाकूर ही जलतरण तलावात दररोज ३ ते ४ तास कठोर सराव करते.

सकाळी ९.३० वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. ९ तास ३९ मिनिटांच्या या खडतर प्रवासात जोरदार वारे, उंच लाटा, भरती/ओहोटीचे तीव्र प्रवाह आणि खवळलेल्या अरबी समुद्राचा स्वराला सामना करावा लागला. कडक उन्हामुळे आव्हान अधिकच कठीण झाले होते. मात्र अफाट सहनशक्ती, मानसिक कणखरता आणि जिद्दीच्या जोरावर तिने हा विक्रम आपल्या नावावर केला. हा संपूर्ण विक्रम महाराष्ट्र राज्य हौशी जलक्रीडा संघटना (MSAAA) यांच्या अधिकृत देखरेखीखाली आणि सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून पार पडला.

आई-वडील आणि प्रशिक्षकांमुळे हे शक्य झाले आहे. विक्रमानंतर स्वराने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या पाठिंब्याला आणि प्रशिक्षक रूपाली रेपाळे व अनिरूद्ध महाडिक यांच्या मार्गदर्शनाला दिले. तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि सरावासाठी जलतरण तलाव उपलब्ध करून दिल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. स्वराचा हा ऐतिहासिक पराक्रम भारतातील खुल्या समुद्र पोहण्याच्या क्षेत्रात उदयास येणाऱ्या नव्या प्रतिभेचे प्रतीक आहे. तिच्या या कामगिरीमुळे देशभरातील युवा जलतरणपटूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी 

वयाच्या दहाव्या वर्षापासून पोहण्यास सुरूवात करणाऱ्या स्वराने यापूर्वीही अनेक मैलाचे दगड गाठले आहेत. कोची ओपन नॅशनल फ्रेशवॉटर स्विमॅथॉन २००६ या १६.१ किमी स्पर्धेत द्वितीय क्रमांक, ओशनमन-थायलंडच्या आंतरराष्ट्रीय खुल्या पाण्यातील स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि विविध राज्यस्तरीय खुल्या पाण्यातील स्पर्धांमध्ये अनेक पदके पटकावली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT