

मुंबई: शंभर कोटीच्या कर्जाच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी सत्यम सुखदेव सत्यार्थी नावाच्या एका व्यावसायिकाविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
यातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे अंधेरीतील विरा देसाई रोड, आझादनगरात एक कार्यालय आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत त्यांची सत्यमशी ओळख झाली होती.
यावेळी त्याने तो दोन खासगी कंपन्यांचा मालक असून तो खासगी कंपन्यांना कर्ज मिळवून देण्याचे काम करतो, असे सांगून त्यांना त्यांच्या व्यवसायात कर्जाची गरज असल्यास त्यांना कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते.
यावेळी त्यांनी त्याच्याकडे व्यवसायासाठी शंभर कोटीच्या कर्जाची मागणी केली होती. त्यानेही त्यांना शंभर कोटीचे कर्ज देतो असे सांगून त्यांच्याकडून कन्सल्टींग फी म्हणून 40 लाखांची मागणी केली.
ही रक्कम मिळाली की त्यांच्या कर्जाची प्रोसेसिंग सुरु होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत एक करार केला. या करारानंतर त्यांनी त्याला 40 लाख रुपये ट्रान्स्फर केले. मात्र एक वर्ष उलटूनही त्याने त्यांना शंभर कोटीचे कर्ज मिळवून दिले नाही. वेगवेगळे कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले, त्यांचा कॉल ब्लॉक केला होता. त्यामुळे त्यांनी सत्यमने दिलेला धनादेश बँकेत टाकला होता, मात्र हा धनादेश न वटता परत आला होता. सत्यमकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सत्यम सत्यार्थी याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.