भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात नवीन बांधकामे मोठ्याप्रमाणात सुरु असून तेथील चिखल वाहून नेणाऱ्या, त्याठिकाणी आरएमसी साहित्य वाहून आणणाऱ्या तसेच ठिकठिकाणी बेकायदेशीर मातीभराव करणाऱ्या वाहनांतून वाहतुकीच्या रस्त्यावर पुन्हा चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र याकडे वाहतूक शाखेसह पालिकेचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
शहरात वायू प्रदूषण वाढल्याचे पावलोपावली जाणवत असताना त्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरविणाऱ्या वाहनांकडे पालिकेचे देखील दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. शहरात काँक्रीट रस्त्यांचे जाळे निर्माण होत असतानाच या काँक्रीटच्या रस्त्यांवर चिखल सांडत असल्याने त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता बळावत आहे. रस्त्यावर पडलेल्या चिखलामुळे वाहने प्रामुख्याने दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तसेच मातीभराव करणारे डंपर्स भरधाव वेगाने ये-जा करीत असल्याने अपघाताची शक्यता आणखी बळावली आहे.
अशा भरधाव डंपर्सच्या धडकेत मागील महिन्यात अनेकांचा जीव गेला असून त्यानंतर वाहतूक शाखेला जाग येऊन शहरात बेकायदेशीर मातीभराव करण्यासाठी येणाऱ्या डंपर्स. आरएमसी मिक्सर वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. मात्र ती देखील काही वेळेपुरतीच मर्यादित राहिल्याने पुन्हा येरे माझ्या मागल्याचा प्रकार सुरु झाला आहे. रस्त्यावर चिखल सांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेची असतानाही त्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यामुळे डंपर, आरएमसी चालक निर्धास्त होऊन भरधाव वेगाने रस्त्यावर चिखल सांडत बेजबाबदारपणे वाहने चालविताना दिसून येत आहेत.
तक्रारीची प्रतीक्षा हवीच कशाला ?
यात प्रामुख्याने दुचाकी चालकांना अधिक धोका निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी प्रवास करताना एखादी दुचाकी रस्त्यावर पडलेल्या चिखलावरून भरधाव वेगात गेल्यास तिचा जीवघेणा अपघात होण्याची शक्यता देखील बळावली आहे. रस्त्यावर चिखल सांडणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित असून त्यासाठी कोणाच्या तक्रारीची प्रतिक्षा करण्यात येऊ नये, असा संतप्त सल्ला लोकांकडून देण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाला गालबोट
यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात शहराला 3 ते 10 लोकवस्तीच्या वर्गवारीत प्रथम क्रमांक मिळाल्याने त्याला या चिखलयुक्त रस्त्याचे गालबोट लागू लागले आहे. यावर ज्या ठिकाणाहून वाहने चिखल वाहून आणीत आहेत अथवा वाहून नेत आहेत तेथील संबंधित विकासक अथवा प्रकल्प चालकावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.