ST bus service pudhari photo
ठाणे

ST bus service : प्रवासी भारमान नसलेल्या एसटीच्या गाड्या बंद होणार

५०२ कोटींच्या तोट्यानंतर परिवहन विभागाचा निर्णय, ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या घटणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : एसटी महामंडळाने वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्याच्या दिशेने पावले टाकली असून भाडे वाढीनंतरही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्यामुळे आता ‘जिथे अधिक प्रवासी, तिथे अधिक गाड्या’ या तत्त्वावर वाहतूक नियोजन करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. प्रवासी भारमान नसलेल्या एसटी फेऱ्या बंद करून भारमान असलेल्या रूटवर वळवण्‍याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे याचा सर्वाधि‍क फटका ग्रामीण भागाला बसणार आहे.

'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली एसटी आता व्‍यावसायिक भूमिका घेऊन काम करणार आहे. एसटीचे हे नवे धोरण परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ यांचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

एसटीच्या स्थानक-आगारापासून १५० किलोमीटरच्या परिसरात तब्बल ९५.४७ टक्के प्रवासी असताना या अंतरात केवळ ५०.४६ टक्के फेऱ्या चालवल्या जात असल्याचे महामंडळाच्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे या भागात शटल फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

एसटीचा आतापर्यंतचा कल मोठ्या प्रमाणावर लांब पल्ल्याच्या फेऱ्यांकडे राहिला. मात्र, प्रवाशांची वास्तविक गरज आणि उपलब्ध फेऱ्यांमध्ये तफावत असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांना वडाप, काळी-पिवळीसारख्या अनधिकृत वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नव्या वाहतूक धोरणात प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून दर महिन्याला निधी द्यावा लागत आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी जवळपास १४ टक्के सरसकट भाडेवाढ करण्यात आली. मात्र, भाडेवाढीनंतरही जुलैचा पगार सरकारकडून निधी मिळाल्यानंतरच करता आला. त्यामुळे एसटीच्या वाहतूक व्यवस्थेत धोरणात्मक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एसटीच्या वाहतूक विभागाने केलेल्या अभ्यासानुसार, स्थानक-आगारापासून १५० किलोमीटरच्या अंतरात ९५.४७ टक्के प्रवासी प्रवास करतात. त्यांच्यासाठी महामंडळाच्या एकूण फेऱ्यांपैकी केवळ ५०.४६ टक्के फेऱ्या चालवल्या जातात. याउलट १५० ते २५० किलोमीटरच्या अंतरात केवळ ३.३३ टक्के प्रवासी असताना १९.७५ टक्के फेऱ्या चालवल्या जातात. तर २५० किलो मीटरहून अधिक अंतरासाठी केवळ १.१६ टक्के प्रवासी असताना तब्बल २९.७९ टक्के फेऱ्या चालवल्या जातात.

परिणामी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या अपेक्षित प्रवासी संख्येविना धावत असल्याचे चित्र आहे. २०१९ पूर्वी एसटीचा भर शटल फेऱ्यांवर अधिक होता. कोरोनानंतर वाहतूक व्यवस्थेत परिस्थितीनुसार बदल झाले. आता पुन्हा त्याच धर्तीवर शटल सेवांना प्राधान्य देत टप्प्याटप्प्याने फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत एसटीने सुमारे ७८६०.१६ लाख प्रवाशांची वाहतूक केली. त्यापैकी ६३.८२ टक्के प्रवाशांचा प्रवास ३० किलोमीटरपर्यंतचा होता. ३१ ते ६० किलोमीटर प्रवास करणारे २०.६१ टक्के, ६१ ते २५० किमी प्रवास करणारे १४.२० टक्के, तर २५० किमीहून अधिक प्रवास करणारे केवळ १.३६ टक्के प्रवासी होते. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत एसटी महामंडळाला ५,८३७.७९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. या कालावधीत महामंडळाचा खर्च ६,३४०.३६ कोटी रुपये झाला.

नवे वाहतूक धोरण

सहा महिन्यांत ५०२.५७ कोटी रुपयांचा तोटा झाला. भाडेवाढी- नंतर जुलै महिन्यात १३८ कोटींचा तोटा नोंदवावा लागला. राज्यातील खेडी, गावांचे झालेले शहरीकरण पाहता, प्रवाशांच्या गरजेनुसार नवे वाहतूक धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT