

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
कर्जबाजारी शेतकरी कर्जाच्या ओझ्यातून मुक्त व्हावा आणि त्याचा सातबारा कोरा व्हावा या स्तुत्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र या कर्जमाफीच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत असून सातत्याने कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याने नाराजी वाढली आहे.
याचबरोबर शासनाने आंबा बागायतदारांचे नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी मदत जाहीर केली आहे. महसूल व कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करून मदत मंजूर केली जात असली तरी प्रत्यक्ष खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
म्हसळा तालुक्यातील सुमारे दोन हजार आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी दोन महिन्यांपूर्वी मंजूर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत अवघ्या २० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली असून आंबा बागायतदार अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड प्रकरणात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून तसेच सहकारी सोसायट्यांमार्फत, बँक ऑफ इंडियाच्या मंजूर झालेल्या कर्जप्रकरणांमध्ये काही थकीत कर्जदार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी जाहीर करण्यात आली आहेत.
मात्र, जे शेतकरी वेळेवर कर्ज घेतात त्याची नियमित परतफेड करतात आणि बँकिंग व्यवहार सातत्याने सुरळीत ठेवतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. “कर्ज घ्यायचे ते थकीत ठेवायचे आणि नंतर कर्जमाफीची अपेक्षा करायची,मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय पाप केले ? असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
शासनाने धोरणाचा फेरविचार करावा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर सवलत किंवा आर्थिक मदत मिळावी तसेच कर्जमाफीच्या निकषांमध्ये पारदर्शकता आणावी अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर मंजूर झालेली आंबा बागायत नुकसान भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीची मदत विलंब न करता संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी अपेक्षा आहे.
कर्जमाफीची अंमलबजावणी नियमित कर्जदारांना न्याय आणि मंजूर नुकसानभरपाईचे तातडीने वितरण याबाबत शासनाने ठोस निर्णय घेऊन ‘शेतकरी राजा’ला दिलासा द्यावा अशी मागणी म्हसळा तालुक्यातील शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
कर्जमाफी जाहीर केली असताना वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसा
महाराष्ट्र शासनाने सरसकट कर्ज माफी जाहीर केली असताना बँक ऑफ इंडिया म्हसळा येथील शाखेने थकीत कर्ज शेतकऱ्यांना नोटीस पाठवून कर्ज भरण्यासाठी तगादा लावला असल्याचे खरसई आणि केलटे येथील शेतकरी धुमाळ, रामचंद्र बोर्ले यांनी माहिती देताना सांगितले.