

मुंबई : ऑनलाइन गेमिंग, क्रिकेट बेटिंग आणि कोकेनच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल बँक अकाउंट’ (बँक खाती) उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा डोंगरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून आणखी पाच आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींकडून ४२ बँक पासबुक, ९० डेबिट कार्ड, ३६ सिमकार्ड, २३ मोबाइल फोन, तीन लॅपटॉपसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डोंगरी पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नियोजनबद्ध तपास सुरू करण्यात आला. तपासात आर्थिक फसवणुकीसाठी ‘म्युल बँक अकाउंट’ उपलब्ध करून देणाऱ्या नेटवर्कचा सहभाग असल्याचे समोर आले. आरोपींकडून विविध बँक खात्यांचे पासबुक, डेबिट कार्ड, चेकबुक, सिमकार्ड आदी साधने ताब्यात घेऊन ती सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले.
मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, डोंगरी परिसरासह नवी मुंबईतील बेलापूर, पनवेल व उल्हासनगर येथे तपासाची चक्रे फिरवण्यात आली. त्यानंतर सेंट्रल रेल्वे स्टेशनबाहेर, डॉ. महेश्वरी रोड, डोंगरी येथे कारवाई करून तिघांना अटक करण्यात आली.
अटक आरोपींमध्ये निखिल कमलकुमार जसवानी (वय २८, रा. पिपरिया, जि. होशंगाबाद, मध्यप्रदेश), राहुल श्यामलाल परवानी (वय ३२, रा. मध्यप्रदेश) व जय बिहारीलाल तीरयानी (वय २६, रा. कटनी, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आणखी पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. याशिवाय तीन महिलांना भा.ना.सु.सं. कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. ज्योती पाटील, जया डोंगे व निशा शिंदे अशी त्यांची नावे असून त्या मानखुर्द येथील लल्लुभाई कंपाऊंड परिसरात राहतात.
पोलिसांनी अटक आरोपींकडून ४२ बँक पासबुक, ९० डेबिट कार्ड, ३६ सिमकार्ड, २३ मोबाइल फोन, ३ लॅपटॉप, ९ पेन ड्राइव्ह, १२ बँक किट व एक मोटार कार असा एकूण सुमारे ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त डिजिटल उपकरणांमधील माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, त्यातून या नेटवर्कशी संबंधित आणखी व्यक्ती व व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.
संबंधित १७ बँक खात्यांच्या तपासातून अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २५ कोटी ४५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या रकमेचा स्रोत, व्यवहाराची दिशा, लाभार्थी खाती, संबंधित व्यक्ती व सायबर गुन्ह्यांशी असलेला संबंध याबाबत सखोल तपास सुरू आहे.
३८ सायबर गुन्हे व तक्रारींचा खात्यांशी संबंध
तपासादरम्यान जप्त केलेल्या ११० बँक खात्यांपैकी १७ खात्यांची माहिती संबंधित बँकांकडून प्राप्त करण्यात आली. या खात्यांतील आर्थिक व्यवहार, तांत्रिक माहिती आणि विविध राज्यांतील सायबर गुन्हे व तक्रारींची पडताळणी केली असता ३८ सायबर गुन्हे व तक्रारींचा संबंध या खात्यांशी असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांतील तक्रारींसह कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात, जम्मू-काश्मीर व पश्चिम बंगाल येथील सायबर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे डोंगरी पोलिसांचा तपास आता मुंबईपुरता मर्यादित न राहता विविध राज्यांपर्यंत पोहोचला आहे.