ठाणे : लोकसभेतील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक निकालाविरोधात उबाठा पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आज उच्च न्यायालयाने विचारे यांची याचिका फेटाळून लावत म्हस्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या न्यायालयाच्या निकालानंतर ‘सत्य परेशान हो सकता है,पराजित नाही!’.असे म्हणत खासदार म्हस्के यांनी न्यायालयाने विचारे यांचा खोटेपणा उघड केला आणि जनतेने दिलेला निर्णय कायम ठेवल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, लोकशाहीत, लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून, प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतरही रडीचा डाव खेळणारे माझे प्रतिस्पर्धी राजन विचारे यांनी माझ्या खासदारकीला आव्हान देत कोर्टात केस दाखल केली होती. आज माझ्या खासदारकीवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
पहिल्या दिवसापासूनच काही जणांनी, विशेषत: उबाठाच्या नेत्यांनी, वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मला 7 लक्ष 34 हजार 231 एवढ्या मोठ्या मतांनी आणि 2 लाख 17 हजार 11 इतक्या फरकाने खासदार म्हणून निवडून दिले. आमच्या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हेच माझं खरं बळ आहे.
आज न्यायालयाने उबाठाच्या नेत्यांचा रडीचा डाव उधळून लावला आहे. मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आश्वासन देतो की तुमच्या विकासकामांसाठी, ठाण्याच्या प्रगतीसाठी आणि जाण्याच्या कल्याणासाठी मी नेहमीच कटीबद्ध आहे असे म्हस्के म्हणाले.