ठाणे : भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात येऊन जनता दरबार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे शह देण्याचा प्रयन्त केला. भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम नवी मुंबईत राबवून प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीमधील मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष पाहायला मिळेल.
ठाणे जिल्हा कुणाचा यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. अगोदरच नाशिक, रायगडमधील पालकमंत्रीपदावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्यात आले असताना भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेतला. तब्बल दहा वर्षानंतर मंत्री थेट जनतेला भेटले आणि सुमारे ६०० पेक्षा अधिक तक्रारीची निवेदने मंत्री नाईक यांना देण्यात आली. उत्फुर्त प्रतिसाद लाभल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आगामी महापालिका निवडणुकांची तयारी भाजपने सुरु केली असून ओन्ली भाजपचा नारा वनमंत्री नाईक यांनी दिला आहे. त्याकरिता ठाण्यात जनता दरबार घेतला. भाजपने ठाण्यात जनता दरबार घेतला तर शिवसेनेचे मंत्री नवी मुंबईत येऊन जनता दरबार घेतील असे प्रतिआव्हान मंत्री भरत गोगावले यांनी दिले होते. तसेच अन्य मंत्र्यांसह सेना नेत्यांनी भाजपला आव्हान दिले होते.
महायुतीत तणाव निर्माण झाल्याने नाईक यांचा जनता दरबार होणार नाही, असे महायुतीच्या नेत्यांना वाटत असताना नुकतेच मंत्री नाईक यांचा ठाण्यातील जनता दरबार लोकप्रिय झाला. त्यामध्ये शिवसेनेचे नेते अथवा पदाधिकारी सहभागी झाले नव्हते. मात्र त्यांची अस्वस्थता वाढली होती. त्यातून आज खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवून नाईक यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना प्रतिउत्तर दिले. खासदारांच्या भेट दरम्यान नवी मुंबईतील शेकडो नागरिकांनी तक्रारी आणि आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या. त्यावेळी तातडीने म्हस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले.
भाजप आणि शिवसेनेत आता शीतयुद्ध सुरु झाले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात मंत्री नाईक हे पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जनता दरबार घेणार असल्याने ठाण्यातील वादाचा वनवा पालघरमध्ये जाणार हे निश्चित आहे. त्याची दाहकता किती आहे ? यावरून महायुतीमधील संघर्ष विसंबून असेल.