ठाणे

Shrikant Shinde : इर्शाळवाडीवासियांची पुढल्या वर्षी हक्काच्या घरात दिवाळी: खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

अविनाश सुतार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्रीपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दिवाळी सणाच्या निमित्ताने इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी सर्व स्थानिक ग्रामस्थांसह तेथील बालकांसमवेत त्यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी खासदारांनी दिवाळीनिमित्त विविध भेट वस्तूंचे वाटपही केले. खासदार डॉ. शिंदे यांनी मुलांसमवेत फराळाच्या आस्वादासह फटाके फोडण्याचाही आनंद घेतला. आपले सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इर्शाळवाडी येथील ग्रामस्थांचे पुनर्वसनाचे काम गतीने सुरू आहे. यामुळे इर्शाळवाडीवासियांची यंदाची दिवाळी जरी तात्पुरत्या निवाऱ्यात साजरी होत असली तरी पुढल्या हीच दिवाळी हक्काच्या आणि सुरक्षित घरात साजरी केली जाईल, असा विश्वासही खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.  Shrikant Shinde

जुलै महिन्याच्या अखेरीस रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेकांना आपला जीव गमावला. यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, तर अनेक बालकांचे कुटुंबछत्र हरपले आहे. या कुटुंबांना आधार देण्यासाठी, तसेच त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. दरम्यानच्या कालावधीत दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी देखील केली. तेथील ग्रामस्थांना सर्व सोयी आणि सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  Shrikant Shinde

या दुर्घटनेमध्ये आपले सर्वस्व गमावलेल्या ग्रामस्थांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इर्शाळवाडीला रविवारी भेट दिली. त्यांनी तेथील बालकांसमवेत दिवाळी सण साजरा करताना त्यांच्याशी हितगुज करत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. लहानग्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या समवेत फटाकेही फोडले. यावेळी उपस्थित सर्वांना दिवाळी निमित्त आनंदाच्या शिदोरीचे वाटप करण्यासह विविध भेटवस्तू, दिवाळी फराळ, तसेच बालकांना विविध उपयोगी साहित्याचे वाटप केले. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळे समाधान दिसून येते होते.

हक्काचे घर लवकरच

या दुर्घटनेत कुटंब छत्र हरपलेल्या बालकांचा आधार बनून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या बालकांच्या शिक्षणाचा सर्व खर्च शिवसेनेसह डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून उचलण्यात आला आहे. यंदाची दिवाळी जरी ग्रामस्थांच्या तात्पुरत्या निवाऱ्यात साजरी होत असली तर पुढच्या वर्षी दिवाळी त्यांच्या हक्काच्या घरात साजरी होईल अशी ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT