इर्शाळवाडीत आजही भयाण शांतता | पुढारी

इर्शाळवाडीत आजही भयाण शांतता

सुभाष म्हात्रे

अलिबाग : काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याच्या इर्शाळ आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधव कामातून दमल्याने साखरझोपेत असतानाच अतिवृष्टीने डोंगराचा मलबा खाली येत इर्शाळवाडीला आपल्या कवेत घेत मोठी दुर्घटना घडली. त्यानंतर तातडीने प्रशासनाने केलेल्या हालचालीमुळे काहींना वाचविण्यात यश आलेले असले, तरी आजही या इर्शाळ आदिवासीवाडीवर भयाण शांतता आणि आदिवासी बांधवांच्या मनात असलेली भीती मात्र आजही कायम आहे.

या घटनेनंतर मातीच्या ढिगाऱ्यातून दिसणाऱ्या घराची मोडलेली छप्परे, त्या खाली दबलेली भांडी, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला मातीचा ढिगारा, मलब्याखालील वस्तू शोधण्याचा सुरु अस- लेला प्रयत्न आणि त्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या भयंकर दुर्गंधीने श्वास गुदमरुन जाईल, अशी भयाण स्थिती सध्या इर्शाळवाडीत आहे. मातीचा ढिगारा अद्यापही इतका भुसभुसीत आहे की, त्यावरुन चालताना आपण कधी मातीत रुतून बसू अशी भीती वाटते. या ढिगाऱ्याखाली अद्यापही ५७ बेपत्ता नागरिक आणि त्यांच्या गुराढोरांचे काय झाले, असेल या विचारानेच अंगावर काटा उभा राहतो. दुर्घटनेनंतर अंगावरील कपड्यानिशी भरलेल्या मनाने तेथील आदिवासींनी आपली वाडी सोडली.

प्रत्यक्ष इर्शाळवाडीची जी परिस्थिती झाली आहे, त्याकडे पाहून वाचलेले नातेवाईक मात्र हताश होत आहेत. सरकारने आमच्यासाठी सर्वकाही दिले, अगदी कपडे शिवण्याच्या सुईपासून सर्व सुखसोयी दिल्या; पण आम्ही आमची वाडी आणि नातेवाईक पुन्हा पाहू शकत नसल्याची खंत या लोकांना आजही सतावतेय, असे तेथील आदिवासी महिला पदी वाघ हिने भावनिक होत सांगितले. महिनाभर तेथे जाण्याची फारशी कोणी हिंमतच केली नाही. आता राहिलेली भांडीकुंडी, सोलरपॅनल, गॅस सिलेंडर अशा वस्तू घेण्यासाठी स्थानिक जाऊ लागले आहेत. मात्र, त्यांच्यातही एकट्याने जाण्याचे मनोबल राहिलेले दिसत नाही. आताही त्यांची कोणतीही तक्रार नाही; परंतु आप्तस्वकीयांच्या आठवणीने त्यांची वाडीकडे जाणारी पावले जड होत आहेत.

वाचलेली जनावरे इर्शाळवाडीच्या माळरानावरच

दरडीमधून काही जनावरे सुखरुप वाचली असून, ती जनावरे माळरानावर असतात. सायंकाळ झाल्यावर हंबरडा फोडणाऱ्या वासराला दुध पाजण्यासाठी येणाऱ्या गायीदेखील कासावीस झाल्याचे चित्र आहे. गोठ्यात आल्यावर मायेने अंगावरुन हात फिरवणारी त्यांची मालकीन हिला शोधण्याचा ते प्रयत्न करताना दिसत असतात.

इर्शाळ वाडीवर अद्यापही चिखलाचा थर कायम

मलब्याखाली दबलेल्या काही घरांवर तीस ते चाळीस फूट चिखल आहे. त्यामुळे दरडीच्या भागात फिरणे नव्या व्यक्तीला खूपच धोकादायक आहे. चिखलात रुतण्याची हमखास शक्यता असते. पडणाऱ्या पावसाने माती अधिकच भुसभुसीत झालेली असल्याने दरडीच्या भागात जाणे ग्रामस्थही टाळत आहेत.

इर्शाळवाडीतील अद्यापही ५७ जण बेपत्ता

इर्शाळवाडी दुर्घटनेत ४१ कुटुंब वेगवेगळ्या घरांमध्ये राहात होते. यातील फक्त पाच ते सहा घरेच अर्धवट स्थितीत आहेत, तर दरडीमध्ये २७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्यापही अंदाजे ५७ जण अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आलेले असले, तरी त्यांना अद्यापही मृत म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. या घटनेत एकूण २२ जण जखमी झाले होते, ते सर्वजण बरे झालेले आहेत. एकूण २९९ लोकसंख्येपैकी १२४ जण सुखरुप ‘बचावले आहेत.

Back to top button