‘आमची इर्शाळवाडी होऊ देऊ नका’; काळवाडी वस्ती येथील ग्रामस्थांची भावना | पुढारी

‘आमची इर्शाळवाडी होऊ देऊ नका’; काळवाडी वस्ती येथील ग्रामस्थांची भावना

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  जांभोरी (ता. आंबेगाव) येथील काळवाडी वस्तीच्या वरील बाजूस डोंगरात भेगा पडल्याच्या दिसत असून, येथील कुटुंबे भीतीच्या सावटाखाली आहेत. या ठिकाणी सततचा पाऊस सुरू असल्याने कधीही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे आमची इर्शाळवाडी होऊ देऊ नका. आमचे लवकरात लवकर पुनर्वसन करून आम्हाला पक्की घरे द्यावीत, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. माळीण घटनेच्या वेळी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या आंबेगाव तालुक्यातील काळवाडी (जांभोरी), बेंढारवाडी (पोखरी), मेघोली (माळीण), पसारवाडी, भगतवाडी (फुलवडे) या पाच गावांमध्ये अद्यापही संरक्षक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

माळीण दुर्घटना घडली, त्यास नऊ वर्षे झाली तरीही प्रशासनाला जाग आलेली नसून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक गावे भीतीच्या सावटाखाली आहेत. जांभोरी येथे काळवाडी ही वस्ती डोंगराच्या खालील बाजूस असून, येथे पस्तीस कुटुंबे वास्तव्यास आहेत. ज्यावेळी माळीणची घटना घडली त्या वेळेस वाडीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, अद्यापही येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. वाडीच्या वर असलेल्या डोंगराला भेगा पडल्या असून, डोंगरावर मोठे दगड आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर कधीही दगड खाली येऊन दुर्घटना घडू शकते.

राजकीय नेते मंडळी दरवर्षी पावसाळ्यात येतात .पाहणी करतात मात्र पावसाळा संपला की, त्यांना येथील नागरिकांचा विसर पडतो. सरकार व प्रशासन दुसरी माळीण झाल्यावरच उपाययोजना करणार का, असा संतप्त सवाल जांभोरी येथील काळवाडीतील ग्रामस्थांनी केला आहे. शासनाकडून घरकुल योजना मिळते. मात्र, त्या योजनेत आमचे घर तयार होणार नाही. शासनाने आमच्यासाठी पक्की घरे बांधून देत आमचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, आमची इर्शाळवाडी होऊ देऊ नये, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी
केली आहे.

हेही वाचा :

कर्नाटक काँग्रेसमध्ये फेरबदल? : दिल्ली बैठकीत होणार निर्णय

नाशिक : बाई, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका..! आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची विनवणी

Back to top button