लज्जतदार मूठे Pudhari News Network
ठाणे

Monsoon Food Delicious Crabs | सुधागडात लज्जतदार मूठे पकडण्याची लगबग सुरू

खवय्यांसाठी मेजवाणी; गावागावात रात्री अनेकजण मुठे पकडण्यात व्यस्त

पुढारी वृत्तसेवा

सुधागड : संतोष उतेकर

जिल्ह्यात पावसाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. त्यामुळे फक्त पावसाच्या सुरुवातीला मिळणार्‍या मुठ्यांचे (खेकड्याची एक जात) आगमन झाले आहे. त्यामुळे खवय्ये आनंदी आहेत. आरोग्यवर्धक, चविष्ट व लज्जतदार मूठ्यांना खवय्यांची पसंती असते. गावागावात रात्री अनेकजण मुठे पकडण्याची मज्जा लुटताना दिसत आहेत.

पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत, डोंगर उतारावर जमीन ओली झाली. गवताची कोवळी पाती डोलू लागली. आणि कोवळ्या गवतावर गुजरान करणारे व फक्त पावसाच्या सुरुवातीलाच बाहेर पडणारे मूठे बिळातून बाहेर आलेले पहायला मिळत आहेत. सध्या चिकन मटणाचे भाव देखिल वधारले आहेत. अशावेळी फक्त पावसाळ्यात बाहेर पडणारे मुठे खवय्यांना मेजवानी ठरतात.

पहिल्या पावसानंतर आलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बिळातून बाहेर पडतात. माळराण, शेत, डोंगर, ओहोळ, नदी आणि खाडीच्या किनारी मुठे सापडतात. रात्रिच्या वेळिच रिमझिम पावसात हे मुठे गवत खाण्यासाठी बाहेर पडतात. कोवळे गवत आपल्या नांग्यांनी तोडून बिळात नेवून निवांत खातात.

रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडू लागल्यावर लोक मुठे पकडण्यासाठी बाहेर पडतात. हातात गॅस बत्ती, टॉर्च किंवा जळता टायर घेतला जातो. सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटची पोती, गोणपाट किंवा प्लास्टिकचा छोटा पिंप किंवा बादली असतो. रात्रभर माळराण, शेत, गवताळ भाग किंवा डोगर उतारावर फिरुन मुठे पकडले जातात. बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात मग दबक्या पावलांनी जावून त्यांना पकडून पोत्यात टाकले जाते. बर्‍याच वेळ फिरुन सुद्धा काहि वेळेस मुठे हाती लागत नाही. त्यासाठी निसर्गाची साथ व योग्य परिस्थिती असावी लागते. वाढते प्रदूषण, शहरीकरण व बांधकामे यामुळे मुठ्यांची निवास्थाने व अधिवास नष्ट होत आहे. तसेच पावसाचा अनियमितपणा या कारणांमुळे प्रजोत्पादन कमी होऊन मुठ्यांची संख्या घटत आहे. विकत आणण्यापेक्षा अनेक जण मुठे व चिंबोर्‍या पकडणे पसंत करतात. मुठे व चिंबोर्‍या विकून आदिवासी बांधवांसह अनेकांच्या हाताला देखिल दोन पैसे मिळतात. काहीजण शेजारी व मित्रपरिवाला भेट म्हणून देखील देतात. मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये राहणारे लोक गावाकडून हमखास मुठे नेतात किंवा आणायला सांगतात.

आकर्षक रंग आणि ठेवण

इतर खेकड्यांपेक्षा आकाराने लहान असलेल्या मुठ्यांचा रंग तजेलेदार काळ व पिवळा असतो. पाठिचा भाग थोडा गोलाकार वर आलेला असतो. त्याचा रंग काळा पिवळा चकाकणारा असतो. पाय व नांगडे पांढरे-पिवळे तजेलदार असतात. एक नांगडा मोठा तर एक छोटा असतो. या सर्व वैशिष्यांमध्ये इतर खेकडे आणि चिंबोर्‍या यामध्ये ते उठून दिसतात.

चविष्ट आणि आरोग्यवर्धक

आकाराने लहान असल्या तरी त्यांचे मांस चविष्ट व आरोग्यवर्धक असते. मुठे वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाल्ले जातात. त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे मुठ्यांचे कवच काढुन त्यामध्ये मुग, तांदूळ किंवा चण्याच्या पिठाचे मिश्रण भरले जाते. हे मिश्रण भरल्यावर धाग्याने पुन्हा कवच बांधुन कालवण तयार केले जाते. आतील गराबरोबरच हे भरलेले मिश्रण चविष्ट आणि लज्जतदार लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT