

सहा-सात खेकडे, चिरलेले काद, लसूण, अगदी बारीक करून घेतलेलं आलं- लसूण-मिरची व कोथिंबीर, चिंचेचा कोळ, कांदा खोबऱ्याचं वाटण, किसलेलं सुकं खोबरं, बेसन (हरभरा डाळीचं पीठ), तांदूळ पीठ, हिंग, हळद, गरम मसाला, मीठ, तेल.
स्वच्छ केलेल्या खेकड्यांची पाठ व पोट वेगळं करा, दुसरीकडे सारणासाठी बेसन भाजून घ्या. त्यात तांदळाचं पीठ, हिंग, हळद, गरम मसाला, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून घट्टसर सारणाचा गोळा करून ठेवा. आता सारण खेकड्याच्या पोट-पाठीच्या मध्ये भरून दोऱ्याने बांधून टाका; म्हणजे सारण बाहेर येणार नाही. रस्सा बनवण्यासाठी तेलात लसूण पाकळ्यांची फोडणी करून त्यावर कांदा आणि अगदी बारीक करून घेतलेलं आलं-लसूण-मिरची व कोथिंबिरीचं वाटण परतून घ्या. त्यात हिंग, हळद, गरम मसाला घालून ढवळा.
आता हे मिश्रण सरसरीत होईल इतपत जेमतेम पाणी घालून त्यात हलक्या हाताने सारण भरून बांधून ठेवलेले खेकडे ठेवा. आधी व्यवस्थित वाफ येऊ द्या. मग हे मिश्रण खळखळून उकळी काढण्यासाठी ठेवा. आता दुसऱ्या बाजूला कांदा खोबऱ्याचं वाटण करा. आधी कांदा, नंतर सुकं खोबरं किंचित तेलावर भाजून मिक्सरमधे बारीक करा. रश्श्याला उकळी आल्यानंतर चिंचेचा कोळ, कांदा- खोबऱ्याचं वाटण आणि गरजेनुसार मीठ त्यात घाला. पुन्हा चांगली उकळी आली की भरलेले खेकडे खाण्यासाठी तय्यार !