कल्याण : बुधवारी रात्री फटाक्यांच्या वादातून उफाळलेल्या कल्याण मोहने येथील दोन गटांतील तुंबळ हाणामारी दगडफेक प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत दोन्ही गटातील आरोपींना अटक केली असून त्यांना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले.
लहुजी नगर परिसरातील 8 आरोपी तर मोहने गावातील 7 आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने लहुजी नगर परिसरातील आरोपींना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर मोहने गावातील आरोपींना 26 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात अजूनही तणावाचे वातावरण असून, कल्याण-मोहणे परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बुधवारी रात्री मोहने पोलीस चौकी परिसरात फटाक्यांच्या वादातून दोन गटात दगडफेक, तोडफोड आणि हाणामारी झाली होती. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.