Cooper Hospital tenders : कूपर रुग्णालयात एका दिवसात काढली तब्बल 14 टेंडर!
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून गलथान कारभार, अस्वच्छता, रुग्णांची हेळसांड याबाबत चर्चेत असलेल्या कूपर रुग्णालयात सुधारणांच्या नावाखाली एकाच दिवशी अंदाजे 6.40 कोटी रुपयांच्या एकूण 14 निविदा काढण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णालय प्रशासनावर आणि महापालिकेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व निविदा पाणीपुरवठा, फायर सिस्टीम, ओटी, लेबर वॉर्ड, हॉस्टेल सुविधा, इमारत दुरुस्ती आणि डिजिटल प्रणाली यांसारख्या विविध कामांसाठी आहेत.
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने हे सर्व टेंडर एकाच दिवशी काढताच ठेकेदारांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबरपर्यंतच निविदा सादर करण्याची मुदत देण्यात आली असून इतक्या मोठ्या प्रमाणात टेंडर एकाच दिवशी काढणे हे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. मनपामधील काही अधिकाऱ्यांनी “हे सर्व निवडक ठेकेदारांना लाभ देण्यासाठी रचलेले खेळ” असल्याचा आरोप केला आहे.
कूपर रुग्णालयातील फायर सिस्टीमपासून लेबर वॉर्ड, ओटी, कॅथलॅब, कर्मचारी निवासस्थानापर्यंत सर्वच विभाग ढासळलेल्या अवस्थेत आहेत. अशा स्थितीत दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा दुरूपयोग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठेकेदारांचा दबाव?
1 नोव्हेंबर रोजी दुपारी चारनंतर लिफाफे उघडले जातील. मात्र एका दिवसात एवढे टेंडर का? अचानक इतकी गती का आली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणात कॉर्पोरेट ठेकेदारांचा दबाव असल्याची चर्चा सुरू असून, कूपर रुग्णालयातील या घडामोडीमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील टेंडर धोरणावर नव्याने वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

