Marathi Natya Sammelan Pudhari
ठाणे

Marathi Natya Sammelan: 101 व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड

नाट्य परिषदेचा एकमताने निर्णय; ज्येष्ठ अभिनेत्याचे स्वप्न पूर्ण, रंगभूमीत आनंदाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : 101 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड करण्यात आली. नाट्य परिषदेच्या 18 मार्च रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत एकमताने ही निवड करण्यात आल्याची माहिती परिषदेचे कार्यवाह अजित भुरे यांनी शुक्रवारी माध्यमांना दिली.

परिषदेच्या 100 व्या संमेलनाचा समारोप 24 ते 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. त्या संमेलनाच्या पूर्वी 101 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी परिषदेच्या वतीने आपल्या 60 शाखांच्या वतीने संमेलनाध्यक्षपदाच्या नावासाठी प्रस्ताव मागवले होते. त्यात मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी,नाटक, मालिका जगतात कार्यरत असणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व बालरंगभूमी व संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेले अभिनेते, गायक व दिग्दर्शक सुरेश साखवळकर यांच्या नावाचे प्रस्ताव आले होते. परंतु त्यात बहुतांश शाखांनी मोहन जोशी यांचे नाव सूचित केले होते. कार्यकारिणीच्या वतीने मोहन जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव नियामक मंडळापुढे सादर केला होता,त्यानुसार एकमताने मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचे माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले, ही बातमी मला आज सकाळीच समजली, मला खूप आनंद झाला.
मोहन जोशी, नियोजित अध्यक्ष -101 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

मोहन जोशी यांचा थोडक्यात परिचय कर्नाटकमधील बेंगलोर येथे 12 जुलै 1953 मध्ये जन्म झालेले मोहन जोशी यांचे शिक्षण व अभिनयाच्या कारकिर्दीस पुण्यातून प्रारंभ झाला. ‌‘कुर्यात सदा मंगलम‌’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर व्यावसायिक पदार्पण केले. त्यानंतर त्यांना हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत भूमिका मिळू लागल्या. 1993 मध्ये प्रदर्शित झालेला ‌‘सवत माझी लाडकी‌’ या चित्रपटाला अमाप यश मिळाले. ‌‘तु तिथे मी‌’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात मोहन जोशी आणि सुहास जोशी यांच्या अभिनयाची नोंद घेण्यात आली.

घराबाहेर या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार, याशिवाय विष्णुदास भावे, झी नाट्यगौरव अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या. याशिवाय गाडगे महाराजांच्या जीवनावरील देबू, गंगाजल, मृत्युदंड या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी भोजपुरी चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या आहेत.2003 ते 2011 या काळात त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT