Traffic Rule Enforcement
ठाणे : प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडींमुळे ठाणेकर हैराण झाले असताना आता नियम पाळण्याच्या नावाखाली वाहतूक पोलिसांकडून त्यांची आर्थिक लूट सुरु करण्यात आली आहे. जनतेला वाहतुकीचे नियम पाळण्याची सक्ती करणाऱ्या सरकारने प्रथम नागरिकांना प्राथमिक सुविधा द्याव्यात, मोफत पार्कींगची व्यवस्था, खड्डेमुक्त रस्ते आणि वाहतूक कोंडीतून सुटका करावी, त्यानंतर वाहन चालकांकडून चलान फाडावे, अशी आक्रमक भूमिका घेत मनसे २० सप्टेंबर रोजी ठाणे पोलिसांविरोधात ट्रॅफिक मार्च काढणार असल्याचे मनसेचे नेते तथा ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. या मार्चमध्ये त्रस्त ठाणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
ठाणे शहराला वाहतूक कोंडीने ग्रासले असून दहा मिनिटांच्या प्रवाशांना दोन ते तीन तास लागत आहे. ठाणे शहरासह घॊडबंदर रोड, भिवंडी रोड नाशिक रोडवरील वाहतूक कोंडीमुळे चार चार तास लागत आहे. यातून मंत्री देखील सुटलेले नाहीत. राज्य सरकारने भरमसाठ दिलेला निधी खर्च होत नसल्याने एकाच ठिकाणी निधीचा वापर केला जात आहे. सर्व्हीस रोड महामार्गात समाविष्ट करून त्याचे पुन्हा दुरुस्ती केली जात आहे. घोडबंदर रोडवरील खड्डे बुजविण्यात आलेले नाही. ठाण्यातील वाहनांना धावण्यासाठी रस्ते नसताना अवजड वाहने ये जा करीत आहेत, यामागे पोलिसांचे आर्थिक गणित असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते.
ठाणेकरांना पार्किंगच्या सुविधा न देता त्यांच्यकडून नियम तोडला म्हणून सीसीटीव्हीवर पाहून दंडाच्या पावत्या पाठविल्या जात आहेत. मागच्या सिटवरील प्रवाशाने हेल्मेट घातले नाही, झेब्रा क्रॉसिंग झाले म्हणून दंड आकारले जात नाही. यावर संताप व्यक्त करीत जाधव यांनी फक्त त्रस्त ठाणेकरांना नियम पाळण्याची सक्ती आणि अवजड वाहन चालकांना अभय ? ते कसेही वाहने रस्त्यावर पार्क करीत आहेत? असे का केले जात आहे. वाहतूक पोलिसांकडून अर्थकारण केले जात आहे का ? असा प्रश्न करीत आम्ही देखील जोपर्यंत चांगले रस्ते, वाहतूक मुक्त ठाणे आणि मोफत पार्किंगची व्यवस्था होत नाही तोपर्यंत चलन भरणार नाही. अशी दंडाची कारवाई थांबवावी, याकरिता २० सप्टेंबरला सायंकाळी साडे पाच वाजता ट्राफिक मार्च काढण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेपासून या मार्चला सुरुवात होईल आणि वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयावर जाईल, यात त्रस्त ठाणेकरांना सहभागी होण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेली दहा वर्ष मंत्री आहेत. तसेच अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत, तरी देखील ठाणेकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता देऊ शकले नाहीत. शिंदे हे अपयशी मंत्री असल्याची टीका मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी करून नव्या गृहसंकुलांना परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी २१ ऑगस्टरोजी घोडबंदर रोडवर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. मात्र त्याची पोलिसांनी अंमलबजावणी पोलिसांनी केली नाही. आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तसेच आदेश दिले आहेत, त्याच्या आश्वासनांवर आमचा विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.