

नेवाळी : बदलापूरच्या बारवी धरणातून पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवाहिन्यांना नेवाळीत टॅपिंग करण्यात आले आहेत. टॅपिंगद्वारे अन्यत्र पाणी पुरवठा सुरू झाला आहे. या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू असल्याने नागरिकांचा रहदारीचा रस्ता मागील दोन दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे.
सर्रास सुरू असलेल्या पाणी चोरीकडे संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष सुरू असल्याने माफियांचे फावले आहे. मात्र या सुरू असलेल्या पाणी चोरीमुळे शहरांना होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने त्यांची ओरड भर पावसाळ्यात सुरू झाली आहे.
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणार्या बारवी धरणाच्या पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्गावरील नेवाळीत अशी हजारो लिटर पाण्याची नासाडी होताना दिसून येत आहे. मात्र पाण्याची नासाडी आणि चोरी ही संबंधित अधिकार्यांच्या निदर्शनास येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डोंबिवली अंबरनाथ महामार्गावरील डावलपाडा गावाजवळ असलेल्या गणपती मंदिराजवळ असणार्या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू असल्याने रस्ते पाण्याखाली जाईपर्यंत पाणी वाया जाताना दिसून येत आहीे.
कल्याण डोंबिवलीमधील नामांकित सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या टंचाई विरोधात सातत्याने मोर्चे काढण्यात येत आहेत. मात्र सुरू असलेली पाणी चोरी वेळीच बंद केल्यास कल्याण - डोंबिवलीच्या आजूबाजूच्या शहरांमधील पाणी टंचाई कायमची मिटणार आहे. त्यामुळे टंचाईमुक्त शहर करण्यासाठी एमआयडीसीला कधीच मुहूर्त मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.