डोंबिवली : रक्षाबंधनाच्या दिवशी नागरिकांना ट्रॅफिकचं आंदण आहे... वर्षानुवर्षे तोच रस्ता...तेच ट्रॅफिक...तीच घुसमट आणि तीच मागणी...आता आम्हालाही त्याच त्याच मुद्द्यावरून सरकारला शालजोडीत द्यायला लाज वाटू लागली आहे. यांना ना जनाची...ना मनाची ! अशा शब्दांत माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून कल्याण-शिळ महामार्गासह याच मार्गावरील देसाई-निळजे-काटई (पलावा जंक्शन) उड्डाण पुलावर शनिवारी सकाळपासून झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीला जबाबदार ठरलेल्या शासनावर आसूड ओढले आहेत.
यांना नागरिकांच्या जीवाचे, वेळेचे आणि जीवनाचे काहीही एक पडलेले नाही. रस्ते रुंदीकरण केले, कितीतरी ब्रिज बांधले, त्याचा मलिदा खाऊन झाला. पुन्हा रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याची वेळ आली. म्हणजे पुन्हा मलिदा खाण्याची संधी उपलब्ध झाली. पण ट्रॅफिकचा प्रश्न काही केल्या या आमच्या ‘बालकमंत्र्याला’ सोडवता येत नाही. कारण या भ्रष्टनाथ मलिदा खाणाऱ्यांसाठी चॉपर आहेत, हवाईमार्ग आहेत, रस्त्यावरून जायची वेळ आली तर नागरिकांना थांबवून यांच्या गाड्यांसाठी रस्ता मोकळा करणारे ट्रॅफिक कंट्रोलर आहेत. पण सामान्य माणसाचं काय ? कल्याण-डोंबिवलीकरांचं अर्ध आयुष्य या ट्रॅफिकच्या गर्दीतच सुरु होणार आणि या गर्दीतच संपणार ! सत्ताधारी मात्र या टक्केवारीतून ओरबाडलेला पैसा वाटून दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपली गद्दार गॅंग वाढविण्यात मग्न राहणार.
खरंतर आश्चर्य त्या लोकांचे वाटते ज्या लोकांना या वाहतुककोंडीचा त्रास होतो व तरीही ते धर्माच्या व भावनेच्या आहारी जाऊन या बकासुरांना मतदान करतात, अशा सर्वसामान्यांच्या मनातील भावना मनसेचे नेते राजू पाटील यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. या पोस्टला लाईक करणाऱ्यांसह पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढत चालली आहे.