मिरा रोड: मुलीला शिकवणी वर्गावरून घरी परतणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात घडवल्यानंतर, अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मिरा रोड भागात घडला आहे. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथील आकृती गार्डन, आयरिस हबटाउन परिसरात राहणारी ४७ वर्षीय महिला २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आपल्या मुलीला ट्युशनवरून सोडून स्कूटीने घरी जात होत्या.
बेव्हर्ली पार्क रोडवरील मेरी गोल्ड बिल्डिंगच्या बाजूला आल्यानंतर समोरून अचानक एक स्कूटी आली आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे फिर्यादी महिला स्कूटीसह रस्त्यावर खाली पडल्या आणि त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली.
अपघातानंतर त्या स्कूटीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी मदत करण्याऐवजी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मिरारोड पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमासह मोटार वाहन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून अज्ञात दुचाकीस्वारांचा शोध सुरू आहे.