

जव्हार: आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा जतन करणे व तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे यादृष्टीकोनातून, आदिवासी पारंपरिक लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे सुप्रसिद्ध तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जीनियस फाउंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांनी वयाच्या अवघ्या १०व्या वर्षापासून या पारंपरिक कलेला गुराखीपासून सुरुवात केली.
विशेष म्हणजे, या कलेच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ८० हून अधिक वर्षे आपले योगदान दिले आहे. बदलत्या काळात आधुनिकतेच्या प्रभावामुळे अनेक पारंपरिक कला लोप पावत असताना, धिंडा यांनी मात्र आपल्या कलेची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, त्यामुळे त्यांची जीनियस फाउंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया (गिनिज बुकात) नोंद झाली आहे, त्यांचे हे कार्य केवळ वैयक्तिक कलासाधना नसून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे, परंपरेचे व ऐतिहासिक वारशाचे जतन करणारे आहे.
त्यांच्या दीर्घकालीन कलासेवेच्या माध्यमातून आदिवासी लोककलेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, नव्या पिढीला आपल्या पारंपरिक कलांचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा मिळत आहे.
या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया यांच्या वतीने त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले, तसेच ८० वर्षांहून अधिक काळ एका पारंपरिक कलेसाठी समर्पित राहणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब ठरली आहे, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या दीर्घ कलाप्रवासाचा गौरव तर आहेच, शिवाय आदिवासी लोककला, संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्व कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
त्यांच्या या गौरवामुळे आदिवासी पारंपरिक लोककलेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मद्दत होईल, तसेच या मौल्यवान सांस्कृतिक वारशाच्या जतन व संवर्धनासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल तसेच तारपा वादक वाजविणे ही कल्ला कायमच राहावी हाच खरा त्यांचा उद्देश आहे, त्यामुळे जीनियस फाउंडेशन यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाच्या वतीने सन्मानित केले.