Mira Road Voting Controversy Pudhari
ठाणे

Mira Road Voting: मतदान केंद्रातच होतोय भाजप उमेदवारांचा प्रचार; मीरारोड परिसरातील धक्कादायक प्रकार

Mira Road Voting Controversy: मीरारोडच्या शांतीनगर प्रभागातील मतदान केंद्रात भाजप उमेदवारांचे प्रतिनिधी छातीवर उमेदवारांची नावे असलेले कार्ड लावून बसल्याचा आरोप मनसेने केला आहे. तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Rahul Shelke

Mira Road Voting Controversy: मीरारोडमधील मतदान केंद्रावर आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतीनगर प्रभाग क्रमांक 20 येथील मतदान केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या क्रमांकासह नावे लिहिलेले कार्ड छातीवर लावून बसल्याचे आढळून आले.

मतदान प्रक्रियेदरम्यान केंद्रात उपस्थित असलेल्या या प्रतिनिधींनी छातीवर लावलेले कार्ड हा थेट प्रचार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. मनसेच्या उमेदवार दृष्टी घाग आणि पक्षाचे पदाधिकारी दिलीप घाग यांनी मतदानासाठी केंद्रात प्रवेश केला असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ आक्षेप नोंदवला.

मनसेच्या नेत्यांचा आरोप आहे की, मतदान केंद्रात कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास सक्त मनाई असतानाही हा प्रकार उघडपणे सुरू होता. विशेष म्हणजे, मतदान केंद्रात पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक कर्मचारी उपस्थित असतानाही कोणाकडूनही या प्रतिनिधींना रोखण्यात आले नाही, ही बाब अधिक गंभीर असल्याचे मनसेने म्हटले आहे.

“मतदारांवर मानसिक दबाव टाकण्यासाठी आणि उमेदवारांची नावे थेट मतदारांच्या नजरेसमोर ठेवून मतप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा हा प्रकार आहे. हा केवळ नियमभंग नाही, तर लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे,” असा आरोप दृष्टी घाग यांनी केला. त्यांनी असा सवालही उपस्थित केला की, जर सर्व प्रतिनिधी एकाच पद्धतीने उमेदवारांची नावे लावून बसले होते, तर निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना हे दिसले कसे नाही?

मनसेकडून या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रतिनिधी आणि उमेदवारांवर गुन्हा दाखल करावा, तसेच निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रसंगी उमेदवारी रद्द करण्याचीही मागणी मनसेने लावून धरली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया किंवा कारवाईबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकारामुळे मीरारोडमधील मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असून, निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT