Mira Road Tipu Sultan Chowk Pudhari
ठाणे

Mira Road Tipu Sultan Chowk: मिरारोडच्या टिपू सुलतान चौकाचे नाव बदलणार? 18 फेब्रुवारीच्या महासभेत निर्णयाची शक्यता

2016 ला महासभेत झालेला ठराव; आता नव्याने सादर करण्यात येणार ठराव

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हजरत टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत असतानाच मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील चौकाला दिलेले टिपू सुलतानचे नाव बदलण्याचा निर्णय येत्या 18 फेब्रुवारी रोजीच्या महासभेत घेतला जाणार आहे.

मालेगाव येथील उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्याचा वाद पेटला उफाळून आला असतानाच उपमहापौरांनी तात्काळ तो फोटो काढल्याने वाद शमला. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे. यावर पुण्यात काँग्रेस, भाजपमध्ये राडा झाला तर नाशिकसह अहिल्यानगर आदी ठिकाणी सपकाळ यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान मिरा-भाईंदर महापालिकेच्या साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतरची पहिली महासभा येत्या 18 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यात मीरारोडच्या प्रभाग क्रमांक 9

या मुस्लिम बहुल प्रभागातील एका चौकाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्या चौकाला टिपू सुलतान यांचे नाव दिल्यापासून त्याला विरोध होत असतानाही ते नाव देण्याचा ठराव 3 डिसेंबर 2016 रोजीच्या महासभेत मंजूर करण्यात आला. हा चौक भारतरत्न स्व. इंदिरा गांधी उड्डाणपुल ते लोढा पार्क रस्त्यादरम्यान असून या चौकाचे हजरत टिपु सुलतान चौक असे नामकरण सर्वानुमते करण्यात आले होते. या नावावरून अनेकदा धार्मिक विरोध झाला असताना पुन्हा ते नाव काढून त्या चौकाला दुसरे नाव देण्याचा निर्णय येत्या महासभेत घेतला जाणार आहे. मात्र मिरा-भाईंदर महापालिकेने पारीत केलेल्या नामकरण प्रस्तावात बदल करण्यात येऊ नये, याकरीता 23 जून 2021 रोजीच्या महासभाईत ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे टिपू सुलतान यांचे नाव

बदलण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली असतानाच नव्याने सादर करण्यात येणाऱ्या नामकरण प्रस्तावाबाबत लोकप्रतिनिधी, विविध राजकीय, सामाजिक संघटना नागरीक यांचेमार्फत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा अभ्यास करुन महासभेपुढे प्रस्तावाची शिफारस करण्याकरीता 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून येत्या महासभेत सादर केला जाणार आहे. याआधारे टिपू सुलतान यांच्या नावाच्या जागी त्या चौकाला दुसरे नाव देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

चौकाचे नामकरण कोणत्या नावाने करणार?

टिपू सुलतान यांच्या नावाच्या जागी परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांचे नाव देण्याची मागणी चक्क पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मिरा-भाईंदर शहर (जिल्हा) महासचिव शफिक अहमद शाह (सुलतानपुरी) यांनी आ. नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर भाजप सत्ताधारी टिपू सुलतान चौकाचे नामकरण कोणत्या नावाने करणार, हे महासभेतील मंजूर ठरावानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT