भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत शहरांतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील जलशुद्धीकरण- साठी मुदतबाह्य सोडियम हायपोक्लोराइडच्या वापर केला जात असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आले.
ही बाब गांभीर्याने घेत स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनी संबंधित ठेकेदाराची चौकशी करून ठेका रद्द करण्यासह त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
हा मुद्दा काँग्रेस नगरसेवक तथा स्थायी सदस्य जय ठाकूर यांनी बैठकीत उपस्थित करून तो समितीच्या निदर्शनास आणून दिला. पालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाकडून शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोडियम हायपोक्लोराइड पुरवठ्यासाठी सुमारे २ कोटी १ लाख रुपयांची मेसर्स मिस्टर मर्क्युरी (इंटरनॅशनल) प्रा. लि. कंपनीच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.
तत्पूर्वी याच कंपनीला पालिकेकडून वार्षिक ठेका देण्यात आला होता. त्यामुळे पालिकेला सोडियम हायपोक्लोराइडचा पुरवठा होत होता. दरम्यान २०२४ मध्ये पालिकेला पुरवठा करण्यात आलेल्या सोडियम हायपोक्लोराइडची मुदत ६ महिन्यांतच संपुष्टात आली. यानंतरही त्याचा वापर होत असल्याचे ठाकूर यांच्या निदर्शनास आले.
हे मुदतबाह्य ठरलेले सोडियम हायपोक्लोराइड शहरातील २८ स्वयंचलित क्लोरिफिकेशन केंद्रांना करण्यात येत होते. हे रसायन मुदबाह्य ठरल्यास त्याची परिणामकारक शक्ती शून्य होते. यामुळे हे रसायन पिण्याच्या पाण्यातील जीवाणू व विषाणूंचा संपूर्ण नाश करण्यास प्रभावी ठरत नाहीत. परिणामी जलजन्य आजारांचा धोका उद्भवतो.
यावरून शहराला मुख्य पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचा जसाच्या तसा पाणीपुरवठा केला जात असल्याचे तूर्तास स्पष्ट झाले आहे. यात लोकांच्या जीवाशी खेळ केल्याचे दिसून येत असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
त्यात तथ्य आढळल्यास संबंधित कंपनीचा ठेका रद्द करून कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यामागील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.