ठाणे : मीरा-भाईंदर येथील नाट्यगृहाचे उद्घाटन होऊनही ते अद्याप सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले असताना स्थानिक प्रशासनाने ते जनतेसाठी खुले करणे अपेक्षित होते. मात्र, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी राजकीय द्वेषापोटी नाट्यगृह खुले होऊ दिले नसल्याचा आरोप परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. कलादालनाच्या ठरावालाही विरोध करण्यात आला होता. जनतेसाठी महत्त्वाची असलेली ही वास्तू खुली केली नाही, तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. अन्य मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून मीरा-भाईंदरच्या राजकारणात कार्यरत असताना भूमिपुत्रांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. भूमिपुत्रांना फसविणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील बहुतांश तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी आणि गरजू नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त मदत पोहोचविणे आवश्यक आहे.
शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना काही मिळाले नसेल, तर राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले.ओवळा-माजिवडा मतदार संघातील गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे कलादालनासाठी १४८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटनही झाले आहे. असे असताना नाट्यगृह आणि कलादालन जनतेसाठी खुले करण्यात विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित करत सरनाईक यांनी स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली.
प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणावरून ठाण्यातील विरोधक एकत्र येऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका मांडताना त्यांनी आरोपींना भरचौकात फाशी देण्याची मागणी केली. मात्र, कोणत्याही घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना सरनाईक म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्तक्षेप असता, तर संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नसते. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशा स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व मोडून काढण्यासाठी अशा प्रकारचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
इम्रान खान यांच्या आंदोलनावरही टीका...
अमेरिकेचे नागरिकत्व असल्याचा दावा करण्यात आलेल्या इम्रान खान यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरही सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी केंद्रातील एनडीए सरकारविरोधात आंदोलन करण्याऐवजी अमेरिकेत जाऊन आंदोलन करावे, असे ते म्हणाले. या संदर्भातील माहिती समोर आणल्याबद्दल त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आभार मानले. न्यायालयाच्या निर्णयाबाबत भाष्य करणे योग्य नसल्याचे सांगतानाच, जनताच आपली न्यायदेवता असल्याचे त्यांनी नमूद केले.
डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न...
ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना सरनाईक यांनी डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जे निर्णय घ्यायचे होते, ते घेण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.