Mira Bhayandar Municipal Corporation pudhari photo
ठाणे

Mira Bhayandar Municipal Corporation : मिरा-भाईंदर महापालिकेत शाकाहार, मांसाहाराचा दुजाभाव

सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांना मांसाहार तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना शाकाहारी जेवण

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर महापालिकेत महासभेच्या मध्यान्हातील भोजनावळीत सत्ताधारी भाजप स्वपक्षाच्या मांसाहारी नगरसेवकांना नॉन व्हेज तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना व्हेज जेवणाची व्यवस्था करीत असल्याने या दुजाभावामुळे पुन्हा एकदा शहरात शाकाहार व मांसाहाराचा मुद्दा पेटू लागल्याचे दिसून आले आहे. यावर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून शहरात नेमके कोणते निर्णय घेतले जात आहेत, याची चर्चा आता नागरीकांमध्ये सुरू झाली आहे. त्यातच महासभेच्या मध्यान्ह भोजनावळीतील शाकाहार व मांसाहाराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

शाकाहार किंवा मांसाहार हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय व श्रद्धेचा विषय आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे तसेच आवडीनुसार शाकाहार किंवा मांसाहार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपचे बहुतांशी नगरसेवक जैन धर्मीय असल्याने ते केवळ शाकाहार पसंत करतात. त्यामुळे अशा नगरसेवकांना केवळ शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

याउलट भाजपचेच जे नगरसेवक शाकाहारासोबतच मांसाहारही करतात त्यांच्यासाठी आवडीनुसार जेवणाची व्यवस्था केली जात आहे. मात्र जे विरोधी पक्षांचे नगरसेवक आहेत त्यांच्यासह इतरांना जैन धर्मीयांच्या शाकाहाराचा आस्वाद घ्यावा लागत आहे. तसा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर झाल्याचे बोलले जात आसले तरी स्वपक्षाच्या आहारासाठी मंजूर ठराव भाजपने बसनात गुंडाळून ठेवला की काय यावरून दिसून येत आहे.

गेली अनेक महिने हा प्रकार सुरू असतानाही विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना त्याविरोधात आवाज उठविण्याची गरज वाटली नाही का, ती गरज आत्ताच अचानक वाटू लागल्याने या जेवणावळीला राजकीय गालबोट लागले आहे. यामुळे शहरात पुन्हा एकदा शाकाहार व मांसाहाराचा मुद्दा पेटू लागल्याचे दिसून आले आहे. याखेरीज जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाच्या कालावधीत शहरातील चिकन, मटण आदी मांस विक्रीच्या व्यवसायाला बंद ठेवण्याची प्रथाच पडली आहे.

अर्थात त्याला शासकीय आदेशाची धार प्राप्त झाल्याने केवळ दोन दिवसाची बंदी सत्ताधाऱ्यांच्या जैन धर्मीय नगरसेवकांच्या अट्टाहासापायी ८ दिवसांपर्यंत लागू करण्याचा प्रयत्न प्रशासनाने अनेकदा केला. त्याला गैर जैन धर्मीयांनी विरोध केल्याने ८ दिवसांची बंदी मागे घेण्यात आली असली तरी आजही दरवर्षीच्या पर्युषण पर्वाच्या कालावधीत पुन्हा-पुन्हा मांस विक्रीच्या व्यवसायांना ८ दिवसांची बंदी घालण्याची लेटरबाजी केली जात आहे.

अशी मागणी होताच गैर जैन धर्मीयांच्या आहार स्वातंत्र्याचा स्वाभिमान जागा होऊन बंदीवाद सुरू होतो. जैन धर्मात मांसाहार मान्य नाही म्हणून इतरांनीही मांसाहार करू नये, असा आग्रह लोकशाही व्यवस्थेत कितपत योग्य आहे, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.

या मुद्द्यावरून शहरात अनेकदा झाले वाद

शहराचा इतिहास व सामाजिक रचना समजून घेतल्यास मिरा-भाईंदर शहर ९ ग्रामपंचायतीच्या एकत्रीकरणातून निर्माण झाले आहे. या शहराच्या जडणघडणीत मूळ भूमिपुत्र आगरी, कोळी, शेतकरी, भंडारी तदनंतर विविध समाजघटकांचे मोठे योगदान राहिले आहे. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमध्ये मासेमारी हा केवळ व्यवसाय नसून अनेक पिढ्यांची परंपरा, संस्कृती व जीवनशैली आहे.

अशा सर्व धर्म समभाव असलेल्या शहरात एखाद्या विशिष्ट समाजाच्या धार्मिक किंवा खाद्यविषयक विचारांचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे तेढ निर्माण होणे, हि चिंतेची बाब ठरत आहे. या मुद्द्यावरून शहरात अनेकदा वाद उफाळून आल्याने परिस्थिती संवेदनशील बनली होती. यंदाही हाच मुद्दा पुन्हा पेटू लागल्याने मांसाहार व शाकाहाराला कोणताही कायदेशीर आधार नसताना तो लादला जात असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.

मांसाहार करणाऱ्या लोकांकडून तीव्र संताप

पालिकेत सत्ता असणे म्हणजे ती कोणत्याही एका धर्माची, जातीची किंवा विचारसरणीची संस्था नसून ती सर्व धर्मीय, सर्व जातींच्या व सर्व विचारांच्या लोकांची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, अशी चर्चा तज्ञ मंडळींमध्ये रंगू लागली आहे. महासभेतील भोजन व्यवस्था हि प्रशासनाची सुविधा असून ती कोणत्याही एका धर्माच्या विचारसरणीचा प्रचार करण्याचे व्यासपीठ बनता कामा नये, अशी अपेक्षा देखील व्यक्त होऊ लागली आहे.

शहरात पाणीटंचाई, रस्ते, वाहतूक कोंडी, गटारे, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांसारख्या अनेक समस्या असून त्यावर ठोस निर्णय घेऊन अंमल करण्याऐवजी शहरातील लोकांच्या आहारावर गडांतर आणून भाजपने राजकारण वा दुजाभाव करणे, हे शहराच्या विकासाच्या तसेच एकोप्याच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. स्वपक्षाच्या नगरसेवकांना मांसाहार व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना शाकाहाराची व्यवस्था करून दुजाभाव निर्माण करणे, यावर मांसाहार करणाऱ्या लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT