Bhiwandi Manhole Accident : मॅनहोलची सफाई करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

भिवंडीतील कामतघर-फेणेपाडातील घटना; एकाला वाचवण्‍यास गेलेल्या दुसऱ्याचाही मृत्यू
Bhiwandi Manhole Accident
Bhiwandi Manhole Accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

भिवंडी : भिवंडी शहरातील कामतघर फेणेपाडा परिसरात गुरुवारी सकाळी ड्रेनेज लाईनच्या मॅनहोलची सफाई करण्यासाठी उतरलेल्या दोघा कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. सुरज अशोक धोत्रे (वय-२०) व शमशाद अब्दुल जब्बार मोमिन ऊर्फ अक्कू (वय-५५) अशी मयत कामगारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम मागील कित्येक वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करत आहे. ते काम आजही अपूर्ण असून कामतघर फेणे पाडा या रस्त्यावरील ड्रेनेज लाईन चोकअप असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. पालिका पाणीपुरवठा विभागाने संबंधित ठेकेदार कंपनीला ड्रेनेज लाईन सफाई करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार ठेकेदाराने स्थानिक कामगार शमशाद ऊर्फ अक्कू यास हे काम सोपवले होते.

Bhiwandi Manhole Accident
Geographical Indication Registration : कोकण हापूस विरुद्ध गुजरात वलसाड आंबा

त्यानंतर त्याने आपल्या ओळखीतील सहा कामगारांना घेऊन फेणेपाडा परिसरातील ड्रेनेज मॅनहोल उघडे करून स्वच्छता करीत असताना कोणतीही सुरक्षा न बाळगता सुरज अशोक धोत्रे हा मॅनहोलमध्ये उतरला परंतु तो गुदमरू लागल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी अक्कू याने केशव या कामगाराला सांगितले.

पण तो घाबरल्याने स्वतः अक्कू त्याला वाचवायला रस्सी पकडून खाली गेला; परंतु त्याचा ही जीव गुदमरल्याने रस्सी सुटली. त्यामुळे तो ही खाली पडल्याने त्याचाही जीव गुदमरून तो निपचित पडला.

या घटनेची माहिती नगरसेवक कमलाकर पाटील यांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी मॅनहोलमधून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाला होता.

Bhiwandi Manhole Accident
Vishwas Patil |'एआय' पूर्णपणे भंपक; घाबरायची गरज नाही : विश्वास पाटील

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा करून मृतदेह स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला होता.

सुरक्षा साहित्याविना कामगार उतरले...

विशेष म्हणजे ही घटना घडून गेल्यानंतर एका तासाने या घटनेची माहिती पालिका आपत्कालीन कक्ष व प्रशासनाला समजली; परंतु ठेकेदाराकडून असे काम करताना ज्या सुरक्षा साहित्यांचा वापर करणे गरजेचे होते ती कामगारांना न देताच या मॅन होलमध्ये उतरवले होते. त्यामुळे दोघा कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूला संबंधित ठेकेदार हे जबाबदार असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील यांनी केली आहे. ठेकेदाराला सदर भुयारी गटार योजना ड्रेनेज काम पूर्ण हस्तांतरित करणे कामी चाचणी व परीक्षण करण्याचे निर्देश दिले होते; परंतु ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेता निष्काळजीपणा केला आहे त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.