राजू काळे
भाईंदर: मिरा-भाईंदरमध्ये जेपी इन्फ्रा या बिल्डरच्या गृहप्रकल्पांची अनेक कामे सुरु आहेत. १७ जुलै रोजी या बिल्डरचे घोडबंदर परिसरात बहुमजली इमारतीचे काम सुरु असताना ११ व्य मजल्यावरील सुमारे १२० फूट उंच क्रेन कोसळून एका तरुणाचा मृत्यू तर एक वृद्धा जखमी झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली.
याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी अद्यापही बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्याने पोलीस या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास घाबरतात का, असा प्रश्न अपघातग्रस्त लोकांकडून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
जे. पी. इन्फ्रा या बिल्डरचे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीतील क्रेन जेके आयरिस इमारतीच्या आवारात कोसळून तेथील वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले तर याच इमारतीच्या एच विंगमधील फ्लॅट क्रमांक ३०७ मध्ये राहणारा मोहम्मद मुजम्मिल खोकर या २२ वर्षीय तरुणाचा क्रेन खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला.
तर याच इमारतीच्या बी विंग मधील फ्लॅट क्रमांक १६०१ मध्ये राहणाऱ्या उमासिंग परिहार या ७२ वर्षीय वृद्धा गंभीर जखमी झाल्या. याखेरीज बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार क्रेनचालक बंटू कुमार, सहाय्यक अरविंद, कोनी, गुड्डू,व चंदन हे कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत.
या बिल्डरकडून बांधकामवेळी सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे यापूर्वी घडलेल्या घटनेपासून निदर्शनास येत आहे. यापूर्वी भाईंदर पश्चिमेकडील तोडी भवन जे. पी. इन्फ्रा या बिल्डरच्या गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे.
२०२४ मध्ये बांधकामाच्या पायलिंगचे काम सुरु असतानाच त्याचा सुमारे ४० फूट लांबीचा लोखंडी शाफ्ट अचानक लगतच्या झोपडट्टीच्या दिशेने कोसळला. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही अन्यथा मोठी जिवीतहानी झाली असती.
याच ठिकाणच्या रस्त्यावर बांधकामातून निघणारा गाळ व चिखल रस्त्यावर पडून रस्ता चिखलमय होतो. परिणामी परिसरात धुळीचे साम्राज्य पसरून सध्या सुरु असलेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय होऊन त्यावरून दुचाकी घसरून अपघात होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय वरदहस्तामुळे प्रशासन मवाळ?
जे. पी, इन्फ्रा या बिल्डरकडून सुरुवातीला २०२४ मध्ये घोडबंदर येथे गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु करण्यात आले. त्यावेळी या गृहप्रकल्पाकडे जाण्यासाठी तेथील पंजाब फौंड्री नामक बांधकाम आड आल्याने पालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते बांधकाम प्राधान्याने हटविले.
यानंतर या प्रकल्पाकडे जाण्यासाठी एमएमआरडीएच्या निधीतून सुमारे ६५ लाखांचा निधी सीसी रस्त्याच्या बांधकामासाठी एका दिवसात मंजूर करून दिला. यावरून हा बिल्डर किती मोठा आहे, याची प्रचिती येत असून त्याच्यापुढे कायदा व गृहविभाग किती ठेंगना होत आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
या बिल्डरच्या जागी इतर सामान्य व्यक्ती किंवा बिल्डर असता तर पोलिसांनी त्याची पाळेमुळे खोदून काढून आपली मोहीम फत्ते केली असती, असा आरोप अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
तक्रार करणाऱ्यांना ४ तास बसवून ठेवल्याचा आरोप
जे. के. आयरिस इमारतीतील तरुणाचा या अपघातात मृत्यू तर वृद्धा जखमी झाली या अपघात ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना तक्रार करण्यास काशिगाव पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलविले होते. पोलिसांनी त्यांना तब्बल ४ तास बसवून ठेवत बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास सपशेल नकार दिल्याचा आरोप मयत तरुणाच्या वडिलांनी केला आहे.