Doctors Strike: येत्या सोमवारी २४ तास आरोग्यसेवा बंद; डोंबिवलीतील डॉक्टर हल्ल्याचे राज्यभर पडसाद

ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
Doctors Strike
Doctors StrikePudhari
Published on
Updated on

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने २० जुलै रोजी सकाळी ६ ते २१ जुलै सकाळी ६ या कालावधीत राज्यभर २४ तास नियमित आरोग्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मागण्यांवर शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि कोषाध्यक्ष डॉ. अमोल गिते यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही घोषणा केली.

Doctors Strike
Palghar Snake Bite Cases: पालघर जिल्हयात एका महिन्यात २३९ जणांना सर्पदंश

डॉक्टरांवरील हल्ला हा संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील हल्ला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही सुरक्षित रुग्णसेवेची पहिली अट असल्याचे आयएमएने स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान राज्यातील नियमित बाह्यरुग्ण विभाग, नियोजित शस्त्रक्रिया आणि नियमित वैद्यकीय सेवा बंद राहतील.

मात्र आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार सुरू राहणार असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. या आंदोलनात आधुनिक वैद्यक, आयुर्वेद, होमिओपॅथीसह विविध वैद्यकीय शाखांतील डॉक्टर, परिचारिका, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि विविध वैद्यकीय संघटना सहभागी होणार आहेत.

Doctors Strike
Lake Cleaning: डोंबिवलीचा मिलापनगर तलाव केडीएमसीकडून साफ

आयएमएने शासनाकडे १० प्रमुख मागण्या मांडल्या असून, डोंबिवली हल्ल्यातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई, महाराष्ट्र मेडिकेअर कायद्यात सुधारणा, राजकीय हस्तक्षेप रोखणे, रुग्णालयांमध्ये २४ तास सुरक्षा व्यवस्था, आरोग्य क्षेत्रातील हिंसाचाराविरोधात 'शून्य सहिष्णुता' धोरण, केंद्रीय कायदा आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

आयएमएचे ज्येष्ठ नेते डॉ. मंगेश पाटे यांनी सांगितले की, हे आंदोलन सर्वसामान्य रुग्णांविरोधात नसून डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच राज्यातील आरोग्यसेवा हिंसामुक्त करण्यासाठी आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आयएमएने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news