भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात वायू प्रदूषणाचा आलेख सतत वाढत असून त्याचा परिणाम शहरातील नागरीकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्याची दखल घेत पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नियमावली जारी करीत शहरातील 40 पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजाविल्याचे समोर आले आहे.
पालिकेने जारी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास संबंधित बांधकाम प्रकल्प बंद करून त्यांना देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून वायू प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. त्याचा परिणाम शहरातील लोकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.
शहरात गृहप्रकल्पांची कामे मोठ्याप्रमाणात सुरु असून माती भरावाने देखील उच्छाद मांडला आहे. शहरात डंपरमधून होणारी डेब्रीज व माती भरावाची वाहतूक शहरात धूळधाण उडवीत वायू प्रदूषण करीत आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी येणारे आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) ची वाहने व डंपरची ये-जा तसेच आरएमसीच्या प्रकल्पात वायू प्रदूषण रोखण्याचे नियम पायदळी तुडविले जात असल्याने शहरातील वातारण धुळमय झाले आहे.
मातीभराव व डेब्रीजची वाहतूक करणारी वाहने त्यातील माती, चिखल, व डेब्रीज रस्त्यावर सांडत असून त्यातून देखील वायू प्रदूषण होत असताना अशा वाहनांवर कारवाई करण्याचे धाडस वाहतूक शाखेकडून दाखविले जात नाही. यामुळे वाहतूक शाखेच्या या दुर्लक्षाकडे सामन्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
एरव्ही सामान्यांच्या वाहनांना लक्ष्य करणारे वाहतूक कर्मचारी रस्त्यावर वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे साहित्य सांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना दिसत नसल्याने लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. हे वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने पुढाकार घेत नियमावली जारी केली आहे. त्यात बांधकामाच्या ठिकाणी वायू गुणवत्ता निर्देशांक 200 पेक्षा अधिक असल्याचे दिसून आल्यास तेथील काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे पालिकेकडून जारी केलेल्या नियमावलीमध्ये
नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या किंवा 70 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या गृह प्रकल्पांभोवती तसेच एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रातील बांधकामाच्या सभोवती किमान 35 फूट उंच पत्र्याचे आच्छादन बांधण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान 25 फूट उंचीचे लोखंडी पत्र्यांचे आच्छादन किंवा कापडांचे आच्छादन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत, हि वाहने प्रकल्पांच्या बाहेर पडताना त्यांच्या टायरवर पाणी मारून ती चिखलमुक्त करण्याची खबरदारी घेण्यात यावी, बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, आदी बंधने पालिकेकडून जारी केलेल्या नियमावलीमध्ये नमूद करण्यात आली आहेत.
प्रशासनाच्या भूमीकेकडे लक्ष
यापूर्वी देखील पालिकेने अशी नियमावली जारी करून वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांना नोटिसा बजविल्या होत्या. मात्र त्याला संबंधितांनी वाटाण्याच्या अक्षता लावीत येरे माझ्या मागल्याचा प्रकार सुरु केला. मात्र यंदा पालिकेने बजविलेल्या नोटिसांवर प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार, हे पहावे लागणार आहे.