

मुंबई : मुंबई विद्यापीठाने एलएलबीच्या पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा अचानक फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालये दोघेही संभ्रमात पडले आहेत. दरवर्षी डिसेंबरच्या मध्यात होणाऱ्या या परीक्षा आता थेट 3 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्याने नियोजनाचा बोजवारा उडाला आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जारी केलेल्या पत्रकात डिसेंबरपासून परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु नोव्हेंबरमध्ये अचानक आलेल्या नव्या सूचनेनुसार, परीक्षा पुढे ढकलून फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यात कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
फेब्रुवारीपर्यंत लांबलेल्या एलएल.बी. परीक्षांमुळे दुसऱ्या सत्राचे वेळापत्रकही पुढे जाण्याची शक्यता आहे. जूनमध्ये घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी परीक्षांवरही याचा परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना आता दीड महिना अधिक प्रतीक्षा व मानसिक ताण सहन करावा लागणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अचानक बदललेल्या या निर्णयामुळे विधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात मोठा गोंधळ निर्माण झाला असून, फेब्रुवारीत परीक्षा निर्विघ्न पार पडाव्यात, एवढीच अपेक्षा विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी व्यक्त केली.
दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या या परीक्षांचे वेळापत्रक सप्टेंबरमध्येच जाहीर झाले होते. नोव्हेंबरमध्ये अचानक आलेल्या निर्णयाने सर्व नियोजन विस्कळीत झाले आहे.
ॲड. सचिन पवार