Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case Pudhari
ठाणे

Pradeep Purnekar Case: राम पुर्णेकरांच्या आरोपांवर मिनाक्षी शिंदे काय म्हणाल्या? वादग्रस्त ऑडिओ क्लिपसंदर्भातही दिलं स्पष्टीकरण

Pradeep Purnekar Murder Case: मानपाड्यातील प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपांवर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

Rahul Shelke

Pradeep Purnekar Murder Case: ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. पूर्णेकर कुटुंबीयांकडून शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

मीनाक्षी शिंदे यांनी या प्रकरणातील आरोप फेटाळून लावत, ठोस पुरावे नसताना कोणावरही आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, आपण आणि आपले पती तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“ठोस पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप थांबवावेत”

मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यासाठी ठोस पुरावे असणे आवश्यक आहे. केवळ आरोप करण्यात आले म्हणून कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. या प्रकरणाचा पोलिसांनी लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

पूर्णेकर कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग आलेला असताना त्यांना काही काळ अवकाश देणे गरजेचे होते. त्यामुळेच आपण गेल्या दोन दिवसांपासून समोर येऊन बोलले नाही, असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे म्हटले की, रागाच्या भरात कोणाकडूनही काही वक्तव्य केले जाऊ शकते. मात्र, अशा वक्तव्यांच्या आधारे थेट कारवाई करणे योग्य नाही. आरोपांपेक्षा तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांना महत्त्व दिले पाहिजे.

“पोलीस चौकशीला पूर्ण सहकार्य करणार”

हत्या प्रकरणाबाबत सध्या कोणतेही भाष्य करण्यास मीनाक्षी शिंदे यांनी नकार दिला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. “माझी किंवा माझ्या पतीची जी चौकशी होणार आहे, त्याला आम्ही सामोरे जाऊ,” असे मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले.

फोटो दाखवून आरोपी ठरवता येत नाही

राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेक व्यक्तींशी संपर्क येत असतो. त्यातून एखाद्यासोबत फोटो असणे म्हणजे संबंधित व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा पुरावा ठरत नाही, असे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.

आपला जन्म आणि राजकीय कारकीर्द ज्या परिसरात झाली, त्या परिसरातील अनेक लोकांशी आपले संबंध आहेत. त्यामुळे कोणासोबत फोटो आहे किंवा कोणाशी संपर्क आहे, यावरून आरोपी ठरवणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर मीनाक्षी शिंदेंचा दावा

या प्रकरणात चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ क्लिपबाबतही मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ही ऑडिओ क्लिप AI जनरेटेड असल्याचा दावा त्यांनी केला.

ही क्लिप यापूर्वीच व्हायरल झाल्यानंतर आपण त्याबाबत तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या ऑडिओ क्लिपचा पूर्णेकर यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या क्लिपबाबत नेमके तथ्य काय आहे, याचा अंतिम निर्णय तपासातूनच स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या त्यावर अधिक भाष्य करणार नसल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.

“प्रत्येक आरोपाला उत्तर देईन”

मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की, तपास यंत्रणेकडून योग्य माहिती आणि दिशा मिळाल्यानंतरच त्या प्रत्येक आरोपाला उत्तर देतील. सध्या पोलिसांना तपास करण्यासाठी मोकळीक देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पूर्णेकर हत्या प्रकरणात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असून, तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT