Pradeep Purnekar death case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पाच संशयित ताब्यात

दोन पथके राज्याबाहेर खाना; आरोपींनी वापरलेल्या दोन मोटारसायकली कापूरबावडी पोलिसांकडून जप्त
Pradeep Purnekar death case
ठाणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.pudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : ठाण्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी तिसऱ्या दिवशी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने गुरुवारी पहाटे मीरा रोड येथून तीन महिला व दोन पुरुष अशा एकूण पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेले संशयित घटनेच्या दिवशी अटक आरोपी पप्या शिंदेव फरार आरोपी संतोष कनोजिया याच्या सतत संपर्कात होते. तिघांपैकी एका महिलेचे फरार आरोपी कनोजियाशी आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. पूर्णेकर यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी वापरलेल्या दोन मोटारसायकली कापूरबावडी पोलिसांनी जप्त केल्या असून या दुचाकींची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून त्यात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह एकूण २३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आरोर्पीच्या शोधात एकूण नऊ पथके तैनात करण्यात आली असून त्यापैकी दोन पथके आरोपींच्या शोधासाठी परराज्यात गेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.मंगळवारी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून आणि धारदार हत्याराने वार करून निघृण हत्या केली.

या प्रकरणी पप्या शिंदे यास हत्येच्या काही तासांनंतर अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टची पोलीस पडताळणी करीत आहेत. पप्याच्या मोबाईल रेकॉर्डनुसार घटनेच्या दिवशी काही महिला व दोन पुरुष सतत त्याच्या संपर्कात होते. त्यानंतर तपास पथकांनी या संशयितांचा ठावठिकाणा शोधून त्यांना मीरा रोड येथून ताब्यात घेतले.

पप्या शिंदे यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गुरुवारी त्यास चौकशीसाठी ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात आणण्यात आले होते. यावेळी एका अन्य संशयितासह पप्याची पोलिसांनी चार तास चौकशी केली.

गुरुवारी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. काही संशयास्पद वस्तूदेखील पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केल्या.

महिनाभरापासून कट

प्राथमिक तपासानुसार प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट सुमारे महिनाभरा पूर्वीच रचला गेला होता. आरोपींनी हत्येच्या कटाची संपूर्ण योजना पूर्वनियोजितपणे आखली होती. त्यासाठी पिस्तूल, हत्यार व दुचार्कीची त्यांनी जमवाजमव केली. हत्येत वापरण्यात आलेली एक दुचाकी आरोपींनी काही दिवसांपूर्वीच २५ हजारांत खरेदी केली होती. पूर्णेकरांच्या हत्येनंतर आरोपींनी या दोन्ही दुचाकी समतानगर भागात सोडून दिल्या होत्या व पळून गेले होते. जप्त केलेली एक दुचाकी एका महिलेच्या नावावर रजिस्टर असून तिलादेखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news