सीटवर झोपल्याबाबत विचारल्याने कैचीने हल्ला File Photo
ठाणे

Thane Crime : सीटवर झोपल्याबाबत विचारल्याने कैचीने हल्ला

दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कामानिमित्त कणकवली येथे गेलेले तक्रारदार भोला पाल (24) आणि त्यांचे इतर मजूर सहकारी ठाण्याकडे येत असताना पनवेलनंतर सीटवर झोपलेल्या दोघा आरोपींना झोपू नका बसायला जागा द्या हे सांगितल्याचा राग आल्याने दोघा आरोपीनी तक्रारदार यांच्यासह सहकाऱ्यांना मारहाण करून तक्रारदार पाल यांच्या पोटावर कैचीने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोन आरोपी प्रवाशांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार भोला पाल (24) व त्याचे मित्र मनीष रामजीवन गौतम (19), प्रकाश बाबुराम पासवान (23), सोनू विजयलाल पासवान (20) आणि अरुण अरविंद पासवान (22) सर्वजण मजुराची कामे करतात. कणकवली येथे कामानिमित्त गेले होते. ते ठाण्याकडे प्रवास करीत असताना त्यांनी 12 नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मंगला एक्स्प्रेस पकडली.

जनरल डब्यात प्रवास करत असताना, पनवेल सोडल्यावर नावडे रोड स्थानक येत नाही तोच एक सीट रिकामी झाली. त्या जागेवर एक प्रवासी झोपला होता. त्यावेळी पाल यांनी “सीटवर झोपू नका, आम्हालाही बसण्यासाठी जागा मिळेल,” असे सांगितले. याचा राग येऊन त्या प्रवाशाने शिवीगाळ केली. त्याच्यासोबत असलेली दुसरी व्यक्तीही आली आणि दोघांनी मिळून मारहाण सुरू केली. त्यापैकी एकाने आपल्या बॅगेतून कात्री काढून पाल यांच्या पोटावर वार केला. जखमी झाल्यावर त्यांच्या मित्रांनी रेल्वे पोलिसांच्या 139 हेल्पलाईनवर कॉल केला होता.

रुग्णालयात उपचार सुरू

साधारण अर्ध्या तासानंतर गाडी कल्याण स्थानकात पोहोचल्यावर ऑन-ड्युटी पोलिसांनी हल्लेखोरांना गाडीतून उतरवले. जखमी पाल यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT