

ठाणे : मध्यप्रदेशातून ठाण्यात आणलेला तब्बल 1 किलो 71 ग्रॅम एमडी ड्रग्जची तस्करी ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने उघड केली आहे. या गुन्ह्यात चार जणांच्या तस्कर टोळीला गजाआड करण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा एमडी आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 2 कोटी 24 लाख 75 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
ठाण्यातील नौपाडा येथे 3 नोव्हेंबर रोजी परप्रांतीय टोळी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने नौपाडा परिसरातील एमटीएनएल कार्यालयासमोर सापळा रचला. यावेळी कारमधून आलेल्या चार संशयित व्यक्तींना पथकाने ताब्यात घेतले.
अधिक चौकशी केली असता हे सर्व आरोपी विक्रीसाठी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अमली विरोधी पथकाने इम्रान उर्फ बब्बु खिजहार खान (37), वकास अब्दुलरब खान (30), ताकुद्दीन रफीक खान (30), कमलेश अजय चौहान (23) या चार आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा एमडी आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 2 कोटी 24 लाख 75 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटकेतील सर्व आरोपी मध्य प्रदेशात राहणारे असून त्यांनी परराज्यातून तस्करी करून हा ड्रग्ज साठा ठाण्यात आणला होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अटक आरोपींपैकी इम्रान आणि कमलेश चौहान हे दोघे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर मध्य प्रदेश राज्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.