

नवी मुंबई ः एपीएमसीतील फळ बाजारात नोव्हेंबर महिन्यात संत्र्यांची आवक वाढते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागपूरसह विदर्भातील संत्री उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे झाडांवरील फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, मुंबईच्या बाजारात संत्र्याची आवक घटल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दरदिवशी 40 ते 50 ट्रक संत्री बाजारात येत होती. आता केवळ 10 ते 12 ट्रक संत्री आवक होत आहे. आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. आकारमानानुसार घाऊक बाजारात संत्र्याचे दर आहेत.
पावसामुळे मालाचा दर्जाही घसरला
पावसामुळे संत्र्यांचा दर्जा खालावला असून फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे विक्रीयोग्य माल कमी उपलब्ध असल्याने बाजारात दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात नागपूर आणि नगर भागातून संत्री येत असून, नोव्हेंबरच्या अखेरीस राजस्थानमधून संत्री येण्यास सुरुवात होईल. परंतु यंदा संत्र्याचे दर पाहता बाजार भावानुसार राजस्थानच्या संत्र्यांनाही चढा दर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा थंडीच्या काळात आंबट-गोड संत्र्याचा आस्वाद घेताना ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत
आकारमानानुसार घाऊक बाजारात संत्र्याचे दर 40 ते 60 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर चांगल्या प्रतीच्या संत्र्यांची कमतरता असल्याने 90 ते 100 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. किरकोळ बाजरात 80 ते 140 रुपये किलोचे दर आहेत.