Marigold farmer loss pudhari photo
ठाणे

Marigold farmer loss : बाजारभावाअभावी मुरबाडमध्ये झेंडूची फुले रस्त्यावर

शेतकऱ्याचा ४५० किमीचा प्रवास, हजारोंचा खर्च, शेवटी फुले फेकण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर : गोकुळाष्टमीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात झेंडूच्या फुलांना चांगली मागणी मिळेल, या आशेने बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात पिकविलेली झेंडूची फुले तब्बल ४५० किलोमीटरचा प्रवास करून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आणली. मात्र बाजारात अपेक्षित भाव तर दूरच, माल खाली करून घेण्यासही व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर शेतकऱ्यावर मुरबाड हद्दीतील टोलनाक्याजवळ मोकळ्या जागेत फुलांचा ढीग खाली करण्याची वेळ आली.

सुमारे ३५ रुपये किलो बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्याने फुलांची वाहतूक केली. मात्र कल्याण येथे आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे त्याने सांगितले. एक रुपया किलोने देण्याची तयारी दर्शवूनही माल स्वीकारला गेला नाही; अगदी फुकट घेण्याची विनंती करूनही गाड्या खाली करून घेण्यात आल्या नसल्याची व्यथा शेतकऱ्याने व्यक्त केली. या प्रवासात आठ हजार रुपयांहून अधिक डिझेलचा खर्च झाल्याचेही त्याने सांगितले.

अखेर मुरबाडजवळ राष्ट्रीय महामार्गालगत फुलांचा माल खाली करण्यात आला. डोळ्यांसमोर हजारो रुपयांचा खर्च करून पिकविलेली, सणासुदीला ग्राहकांच्या घरात सुगंध आणि आनंद पसरवू शकणारी ही फुले अक्षरशः रस्त्याच्या कडेला पडली. ही घटना केवळ फुले फेकून देण्याची नाही, तर शेतकऱ्याच्या मेहनतीची, आर्थिक नियोजनाची आणि त्याने उराशी बाळगलेल्या अपेक्षांची झालेली परवड आहे.

बी-बियाणे, रोपे, खते, औषधे, मजुरी, पाणी व वाहतुकीवर खर्च करून शेवटी मालाला बाजारपेठच मिळत नसेल, तर शेतकऱ्याने उत्पादन घ्यायचे तरी कशासाठी, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. कल्याण-मुरबाड महामार्गाच्या परिसरात विक्री न झालेली झेंडूची फुले टाकलेली दिसतात. त्यामुळे शेतमालासाठी सक्षम बाजारव्यवस्था, योग्य दराची उपलब्धता व समित्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

रस्त्याच्या कडेला पडलेला झेंडूच्या फुलांचा ढीग पाहताना रंग फक्त फुलांचा दिसतो; त्यामागे एका शेतकऱ्याचे स्वप्न दडलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेकडे केवळ रस्त्यावर टाकलेल्या फुलांचा प्रकार म्हणून न पाहता, शेतमालाच्या बाजार व्यवस्थेतील गांभीर्य दाखवणारी घटना म्हणून पाहून योग्य ती चौकशी व उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी

शेतकऱ्याचा माल बाजारात पोहोचण्यापूर्वीच त्याला योग्य बाजारपेठ, मागणी आणि दराची माहिती मिळणे आवश्यक आहे. बाजारभाव कोसळल्यानंतर हजारो रुपये खर्च करून शेतमाल लांबच्या बाजारात नेण्याची वेळ शेतकऱ्यावर येत असेल, तर कृषी विभाग, बाजार समिती आणि संबंधित यंत्रणांनी या व्यवस्थेतील त्रुटींचा गांभीर्याने आढावा घेण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही म्हणून त्याची मेहनत कचऱ्यात जाणे ही केवळ बाजारातील चढ-उताराची बाब म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. शेतकऱ्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन, बाजारभावाची पूर्वमाहिती आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT