Thane civic administration : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेलाही पालिका अधिकाऱ्यांचा ठेंगा?

सत्ताधारी शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी नगरसेवकाचेच पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन
Thane civic administration
Thane civic administrationpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाईलवर स्पष्ट सूचना करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत सत्ताधारी शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, महापालिकेत सत्ताधारी शिवसेना पक्षाची सत्ता असतानाही आपल्या मागण्यांसाठी पक्षाच्याच ज्येष्ठ माजी नगरसेवकाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उपायुक्त मुख्यालय जी. जी. गोदेपुरे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत त्यांनी गोदेपुरे यांच्या दालनाबाहेरील नेमप्लेटला हार घालून अधिकाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले.

पालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वैती यांनी केला. नागरिकांची तसेच कर्मचाऱ्यांची अनेक कामे नियमाप्रमाणे आणि तातडीने होणे अपेक्षित असताना ती प्रलंबित ठेवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. काही कामे अर्ध्या तासात पूर्ण होऊ शकतात; मात्र त्यासाठी तब्बल सात दिवसांचा कालावधी लावला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Thane civic administration
Kalyan Dombivli hawkers protest : डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील कारवाईने कष्टकऱ्यांची निदर्शने

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपैकी पंच ऑपरेटरच्या फाईलचा मुद्दा विशेष चर्चेत आला आहे. या फाईलवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या, मात्र, या सूचनेनंतरही संबंधित फाईलवर अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी आंदोलनादरम्यान सांगितले. त्यामुळे वरिष्ठ राजकीय नेतृत्वाच्या सूचनांनंतरही पालिका प्रशासनातील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

पालिका मुख्यालय उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्या दालनाबाहेर वैती यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरोधात नाराजी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांच्या दालना बाहेरील नेमप्लेटला हार घालण्यात आल्याने या आंदोलनाची पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रश्न, प्रलंबित फाईली व प्रशासकीय कामांतील विलंबाबाबत वैती यांनी प्रशासनाला जाब विचारला.

Thane civic administration
Mumbai Vijaydurga Ro-Ro service : विजयदुर्ग रो-रो सेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

वरिष्ठ स्तरावरून सूचना दिल्यानंतरही सूचनांची अंमलबजावणी होत नसेल, तर प्रशासनात नेमके चालले तरी काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विशेषत: अशोक वैती हे सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तीलाच आपल्या मागण्यांसाठी महापालिका मुख्यालयात आंदोलन करावे लागणे ही बाब राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे राज्याच्या नेतृत्वाकडून प्रशासकीय कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या जात असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर फाईली प्रलंबित राहत असल्याच्या आरोपामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात उपायुक्त मुख्यालय जी. जी. गोदेपुरे आणि अधिकारी दयानंद गुंडप यांच्याकडून कार्यवाही झाली नसल्याचा आरोप वैती यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकानेच प्रशासनाविरोधात थेट आंदोलन केल्याने आगामी काळात या प्रकरणावरून महापालिकेतील राजकारण तापण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर संबंधित फाईलवर काय निर्णय होतो, याकडे आता पालिका कर्मचारी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news