Marathi Language Certificate Pudhari
ठाणे

Marathi Language Certificate: ‘मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा’; ७ हजार अमराठी रिक्षाचालकांना प्रमाणपत्र

७ हजार अमराठी रिक्षाचालकांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मराठी भाषा प्रमाणपत्र वितरण

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर: मराठी हि केवळ सक्तीची भाषा नसून ती भक्तीची व अस्मितेची भाषा असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा कार्यक्रमांतर्गत आयोजित मराठी भाषा प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ७ हजार अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

महाराष्ट्राच्या भूमीत राहून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या व व्यावहारीक मराठी भाषा शिकून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप झालेल्या अमराठी रिक्षाचालकांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मराठी भाषा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व परंपरा यांच्याशी अमराठी बांधवांना जोडण्याचे हे एक पवित्र कार्य आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ व इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हजारो अमराठी बांधव आत्मविश्वासाने मराठी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल १ हजार ८०० केंद्रांच्या माध्यमातून १८० वर्ग चालवून १ लाख ६५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी अमराठी रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्यात आले.

यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान पुन्हा ताकदीने सुरू होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे अभियान २ ऑक्टोबर २०२६ ते २३ जानेवारी २०२७ या कालावधीत राबविले जाणार असून मुंबई, महाराष्ट्रात राहून प्रवासी व्यवसाय करायचा असेल, तर व्यावहारिक मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याचा इशारा पुन्हा त्यांनी दिला.

कायदा रद्द झालेला नाही, तर अमराठी चालकांसाठी १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली. या काळात मराठी भाषा मनापासून शिकून घ्यावी. महाराष्ट्रात राहायचे असेल, इथे व्यवसाय करायचा असेल, तर मराठीचा आदर करणे व ती व्यवहारात बोलणे अनिवार्यच आहे. मराठी हि सक्तीची नाही तर भक्तीची भाषा असल्याचे त्यांनी म्हटले.

मराठी भाषा प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ७ हजार रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकल्याने त्यांना सरनाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र माझा, पण मुंबई कुणाची? नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. १०७ हुतात्म्यांचे बलिदान, तत्कालीन राजकारण व आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, सेनापती बापट व प्रबोधनकार ठाकरे यांच्या ऐतिहासिक लढ्याची गाथा या नाटकाद्वारे सादर करण्यात आली.

मराठी हि केवळ संभाषणाची भाषा नसून महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता, आपल्या संस्कृतीची भक्ती व महाराष्ट्राची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या मातीत आपण राहतो, जिथे कष्ट करून आपला उदरनिर्वाह चालवतो, तिथल्या भाषेचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी नाही. त्यामुळे इथे व्यावसायिक सेवा देणाऱ्या प्रत्येक रिक्षा, टॅक्सी चालकाला व्यवहारात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे.

हे सरकार रोजगार देणारे

कोणाचाही रोजगार हिरावून घेणे किंवा कोणावर अन्याय करणे हा आपला उद्देश मुळीच नाही. राज्यातील महायुती सरकार हे रोजगार देणारे सरकार आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही अमराठी बांधवांना स्वतः पुढाकार घेऊन आपुलकीने व प्रेमाने मराठी शिकवित आहोत.

मराठी भाषेची अनिवार्यता हा आमचा ठाम व स्पष्ट निर्णय आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियानाच्या माध्यमातून आम्ही १ लाख ६५ हजाराहून अधिक बांधवांना समृद्ध मराठीशी जोडल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT