

महाड: गणेशोत्सव म्हणजे केवळ बाप्पाची प्रतिष्ठापना नव्हे, तर आपल्या संस्कृतीतील कलाकुसर, परंपरा आणि कल्पकतेला उजाळा देण्याचा उत्सव. महाड तालुक्यातील लाडवली येथील नवयुग मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर पाटील यांच्या कोटेश्वरी तळे येथील निवासस्थानी यंदाच्या गणेशोत्सवासाठी साकारण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटीने याचीच प्रचिती दिली आहे.
त्यांचा मुलगा राज मनोहर पाटील, जो सध्या एमबीएचे शिक्षण घेत आहे, याने टाकाऊ पुठ्ठ्याचा कल्पक वापर करून जुन्या काळातील पारंपरिक मराठी वाड्याची लघुरूप प्रतिकृती साकारली आहे.
आजच्या आधुनिक युगात जुन्या वाड्यांची रचना आणि त्यातील जीवनशैली अनेकांसाठी केवळ आठवणींचा भाग राहिली आहे. मात्र, राजने गणरायाच्या सजावटीच्या माध्यमातून हा हरवत चाललेला वास्तूवारसा पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा केला आहे.
या लघुरूप वाड्यात कौलारू छप्पर, लाकडी तुळया, कोरीव लाकडी खांब, मजबूत ओटे, मातीच्या भिंती, लाकडी चौकटी आणि छोट्या खिडक्या यांची बारकाईने मांडणी करण्यात आली आहे.
वाड्याच्या प्रत्येक भागातील सूक्ष्म तपशील सजावटीचे वास्तवदर्शीपण अधिक खुलवतो. भिंतींवरील पारंपरिक नक्षीकाम, ओट्यावर ठेवलेली भांडी, पूजेचे साहित्य, समई, दिवे, तुळशीचे रोप, नारळ, केळीची पाने आणि फुलांची आरास यामुळे एखाद्या जुन्या मराठी वाड्याच्या अंगणात प्रवेश केल्याचा अनुभव येतो.
पुठ्ठ्याला कलात्मक आकार देऊन या संपूर्ण सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर टाकाऊ पुठ्ठ्याचा वापर करण्यात आला आहे. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या टाकाऊ साहित्याला कल्पकतेची जोड देत राजने वाड्याची रचना साकारली. त्यानंतर कुंकवापासून तयार केलेल्या रंगाचा वापर करून वाड्याला पारंपरिक रूप देण्यात आले.
साधारण चार दिवसांच्या मेहनतीनंतर ही कलाकृती पूर्णत्वास आली. वाड्याच्या मध्यभागी फुलांनी सजविलेल्या आकर्षक सिंहासनावर श्री गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उबदार पिवळसर प्रकाशयोजना, लहान दिव्यांची आरास आणि पारंपरिक वस्तूंची केलेली मांडणी यामुळे संपूर्ण परिसराला प्रसन्न, शांत आणि भक्तिमय वातावरण लाभले आहे.
राज पाटीलने साकारलेला हा वाडा केवळ गणपतीची सजावट म्हणून पाहता येणार नाही. जुन्या मराठी वाड्यांची वास्तुकला, ग्रामीण जीवनपद्धती, घरगुती परंपरा आणि मातीशी असलेले नाते यांना या कलाकृतीतून कलात्मक मानवंदना देण्यात आली आहे.
आजच्या पिढीला जुन्या वाड्यांची ओळख व्हावी,टाकाऊ वस्तूंचाही वापर करून सुंदर कलाकृती निर्माण करता येते, हा संदेशही या सजावटीतून मिळतो. आधुनिक शिक्षण घेत असतानाच आपल्या मातीतल्या संस्कृतीशी नाते जपणाऱ्या राजच्या या कल्पकतेचे परिसरातून कौतुक होत आहे.टाकाऊ पुठ्ठ्याला कल्पकतेची जोड, चार दिवसांची मेहनत,जुन्या आठवणींना दिलेले कलात्मक रूप सर्जनशीलतेच दर्शन घडवत आहे.